युवा महिला खेळाडूला मिळाला मदतीचा हात

satana
satana

सटाणा - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वायगाव (ता. बागलाण) येथील नवोदित फ्रीस्टाइल रेसलिंग क्रीडापटू वैशाली अहिरे हिला आज शुक्रवार (ता.८) रोजी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी दुबई येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धेत सहभागी होण्यासाठी रोख अकरा हजार रुपयांची मदत देत पाठीवर शाबासकीची थाप दिली.

वायगाव येथील शिवाजी अहिरे या सर्वसामान्य कोरडवाहू शेतकरी कुस्तीपटूच्या घरात वैशालीचा जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची मात्र वैशालीला खेळाची विशेष आवड असल्याने तिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शालेय स्तरावर विविध खेळातून राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली. दरम्यान, तिच्या प्रशिक्षणासाठी आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या वडिलांनी उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेली शेतजमीनसुद्धा विकली. येत्या महिन्यात दुबई येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय फ्रीस्टाइल रेसलिंग स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणाऱ्या वैशालीला मात्र आर्थिक विवंचनेमुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांना वैशालीच्या जिद्दीची माहिती समजताच आज जागतिक महिला दिनी त्यांनी वायगाव येथे थेट वैशालीचे घर गाठले आणि तिच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. प्रशिक्षणात तिला कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये यासाठी आमदार सौ. चव्हाण यांनी स्वतः अकरा हजार रुपयांची मदत देत आंतरराष्ट्रीय पातळीवर बागलाणचे नाव उंचवण्यासाठी वैशालीला शुभेच्छा दिल्या. तसेच तिच्या क्रीडा कौशल्याला न्याय देण्यासाठी शासनस्तरावरून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासनही आमदार सौ. चव्हाण यांनी यावेळी दिले. यावेळी आमदार सौ. चव्हाण यांनी वैशालीला घडविणार्‍या आई-वडिलांचाही सत्कार केला. 

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वंदना भामरे, सोशल मीडिया सेलचे सचिन जाधव, वायगावचे उपसरपंच मोहन अहिरे, प्रल्हाद देवरे, गोरख निकम, नवनाथ अहिरे, पुंडलिक आहिरे, तानाजी गभाले, मिराबाई गव्हाणे, कृष्णा गभाले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

वैशाली अहिरे हिने प्रतिकुल परिस्थितीत मिळविलेले यश अत्यंत कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील युवतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर मारलेली मजल ही इतरांना प्रेरणा देणारी आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी परदेशात जाणाऱ्या वैशालीला शासनस्तरावरून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.         
- सौ. दीपिका चव्हाण, आमदार, बागलाण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com