‘महिला बालकल्याण’ चे रिपोर्टकार्ड कोरेच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

शौचालय, बोअरवेल्सचीच चर्चा, अकरा महिन्यात दोनच सभा; तिसऱ्या सभेपुढेही तेच विषय

धुळे - महापालिकेच्या महिला बाल कल्याण समितीला वर्षभरात दोन सार्वजनिक शौचालयांची कामे वगळता काहीही ठोस कामे करता आली नाही, उपक्रम राबविता आले नाही. गेल्या अकरा महिन्यात केवळ दोनच सभा घेता आल्या. उद्या (ता.२७) तिसरी सभा होणार आहे. मागील सभेत तब्बल ५३ बोअरवेल्सला मंजुरी देणाऱ्या समितीपुढे उद्याही दोन बोअरवेल्स व एका शौचालयाचा विषयच मंजुरीसाठी आहे हे विशेष.

२२ जानेवारी २०१७ ला महिला बालकल्याण समितीचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे कार्यकाळ संपत असलेल्या समितीला महिला, मुली-बालकांसाठी काहीही ठोस कामे करता आली नाही ही वस्तुस्थिती आहे. समितीला वर्षभरात केवळ दोनच सभा आतापर्यंत घेता आल्या (उद्या ता.२७ तिसरी सभा होत आहे) या दोन सभांमध्येही शौचालय व बोअरवेल्सच्या कामाव्यतिरिक्त काहीही करता आलेले नाही.

प्रशिक्षणासह इतर विषय रेंगाळला
समितीच्या माध्यमातून महिला-मुलींना एमएस-सीआयटी प्रशिक्षण देण्याचा संकल्प करत समितीने विषय मंजूर केला खरा पण हा विषयही अद्याप मार्गी लागला नाही. बारावीची अट असल्याने लाभार्थ्यांचे अर्जच आले नाहीत, त्यामुळे ही अट दहावीपर्यंत करण्यात आली. आता या प्रशिक्षणासाठी निविदा प्राप्त झाल्या खऱ्या पण त्यात त्रुटी असल्याने निविदा मंजूर करण्यात अडचणी आहेत. एकंदरीत प्रशिक्षणाचा संकल्प पूर्ण झाल्या नसल्याचेच चित्र आहे. गर्भवती व शालेय विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी करणे, महिलांना मोफत कायदेविषयक समुपदेशन करणे, मुलींची शाळेतील गळती रोखण्यासाठी प्रोत्साहन भत्ता देणे असे विषयही समितीने घेतले होते. मात्र असेच कार्य शासनाच्या इतर योजनांमधून होत असल्याने पुन्हा तीच कामे करणे सयुक्तिक नसल्याचे समोर आल्याने हे विषयही बाजूला पडले.

बोअरवेल्सचा धडाका
१३ ऑक्‍टोबर २०१६ ला झालेल्या सभेत समितीने शहरातील विविध भागात तब्बल ५३ बोअरवेल्सला मंजुरी दिली होती. या बोअरवेल्स व पंपसेटसाठी अंदाजे २९ लाख ७२ हजार ८८८ रुपये खर्च अपेक्षित होता. हा बोअरवेल्स करण्याचा धडाका समितीने सुरूच ठेवला आहे. उद्या (ता.२७) ला होणाऱ्या तिसऱ्या सभेतही दोन ठिकाणी बोअरवेल्स व एका ठिकाणी शौचालय बांधण्याचाच विषय आहे.

६० लाखांचा निधी
२०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी पाच टक्के निधी याप्रमाणे सुरवातीला ३४ लाख १५ हजार रुपयांचा निधी समितीसाठी होता. महासभेने बजेटमध्ये वाढ केल्यामुळे समितीचा हा निधी ५९ लाख ४८ हजार रुपये एवढा झाला. या सुमारे ६० लाखांच्या निधीचा विनियोग समितीला केवळ शौचालय, बोअरवेल्सवरच करता आला आहे.

Web Title: women children development report card