महिलांची गँग अटकेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

जळगाव  - जळगाव जिल्ह्यासह शेगाव, अकोला, खामगाव, बोदवड आणि इतर ठिकाणांवरून चोरी केलेले सोने मोडण्यासाठी सराफ बाजारात आलेल्या महिला गँगला शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आज ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन लाख १८ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. 

जळगाव  - जळगाव जिल्ह्यासह शेगाव, अकोला, खामगाव, बोदवड आणि इतर ठिकाणांवरून चोरी केलेले सोने मोडण्यासाठी सराफ बाजारात आलेल्या महिला गँगला शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आज ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन लाख १८ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. 

शहरात मुख्य बाजारपेठेत गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्स, दागिने लांबवण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. भुरट्या चोऱ्यांसह महिला गॅंग मार्फत चोऱ्यांचे प्रकार वाढल्याचे निदर्शनास आल्यावरून पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, ‘डीवाएसपी’ सचिन सांगळे यांच्यातर्फे महिला गॅंगवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार भुसावळच्या महिला गॅगच्या दोन महिला सराफ बाजारात सोने मोडण्यासाठी येणार असल्याची माहिती संजय हिवरकर यांना काल (ता. २७) मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात वासुदेव सोनवणे, उल्हास चऱ्हाटे, संगीता खांडरे, संजय हिवरकर, गणेश शिरसाळे, संजय भालेराव, सुधीर सावळे, मोहसीन बिराजदार, अक्रम शेख, इम्रानअली सैय्यद, अमोल विसपुते, रतनहरी गिते यांचे पथक तयार करून सराफ बाजारात सापळा रचला होता. आज दुपारी अडीचच्या सुमारास पोलिसांना (जीजे.२१ ऐएच.२६२३ ) ही संशयित इंडिका आढळून आली. कार थांबवून तपासणी केली असता, त्यात बसलेले सुपियाबी शेख मुनीब (वय २६, रा. खडका रोड), नजमाबी शेख जावीद (वय २६, रा. खडकारोड) या महिलांसह जावेद मुसा गराना (वय २७, रा. मिठी खाडी सुरत) यांना अटक केली आहे.

सव्वातीन लाखांचा ऐवज जप्त
पोलिसांनी कारची तपासणी आणि माहिती घेतल्यावर दोन्ही महिलांसह चालकाला ताब्यात घेत शहर पोलिस ठाण्यात आणले. पोलिसी खाक्‍या दाखवताच महिलांकडून १ लाख ५२ हजार ३१६ रुपये किमतीचे (५२.६९० ग्रॅम) सोन्याचे दागिने, २३ ग्रॅम ८९० रुपयांचे चांदीचे दागिने पंधरा हजार रोख रक्कम, इंडिका कार असा एकूण ३ लाख १८ हजार २०६ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. दागिने कोठून आणले याची विचारपूस चौकशी केली असता अटकेतील महिलांच्या टोळीने जळगाव जामोद, खामगाव, आकोलारिंग, बोदवड, अडावद किनगाव, अमळनेर, शेगाव, मलकापूर आदी ठिकाणाहून केलेल्या चोरीतील हा सर्व मुद्देमाल असल्याची त्यांनी कबुली दिली आहे. 

टोळीचा शोध सुरू
ताब्यात घेतलेल्या महिलांनी पोलिसी खाक्‍या दाखवल्यावर कबूल केल्यानुसार त्यांनी काही दिवसांपूर्वी फुले मार्केटमधून एका महिलेची पर्स लांबवून ३५ हजार लांबवल्याची कबुली दिली आहे. अटकेतील महिलांसोबत त्यांच्या टोळीत इतर महिला चोर असून, जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर चोऱ्या करून ऐवज लांबवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. याच गुन्ह्यात दोघा महिलांना अटक करण्यात येऊन त्यांच्या चौकशीत इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: women gang arrested crime