शिरपूरला महिला पोलिसांची दबंगगिरी!

सचिन पाटील
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

शिरपूर - शहरातील वाहतुकीला शिस्त लावताना मेटाकुटीस आलेल्या शिरपूर पोलिसांतील महिला कर्मचारी मात्र आगळ्यावेगळ्या पद्धतीने ‘सुसाट’ दुचाकीस्वारांना वठणीवर आणत आहेत. बेशिस्त दुचाकी चालवून स्वतः:सकट इतरांचाही जीव संकटात आणणाऱ्या स्वारांना रस्त्यावरच उठाबशा काढायला लावून महिला पोलिसांनी धाक निर्माण केला आहे. त्यांना पाहून तीन सीट असलेले दुचाकीस्वार एकतर रस्ता बदलतात किंवा दूरवर दुचाकी उभी करून त्या निघून जाण्याची वाट पाहतात. या कर्मचाऱ्यांची दबंगगिरी हा शहरासाठी कुतुहलासह कौतुकाचा विषय ठरला आहे. 

शिरपूरचा मेनरोड, कॉलेजरोड, निमझरी नाका, करवंद नाका या रस्त्यांवर चालताना धूम स्टाइल बाईकस्वारांची भीती प्रत्येकाच्या मनात असते. अवघी १५-२० वयाची पोरंटोरं भरधाव वेगात दुचाकी हाकतात. घरून शिकवणी, महाविद्यालय आदींच्या नावाखाली तीर्थरूपांची दुचाकी घेऊन निघालेले हे विद्यार्थी रस्त्यात जीवघेण्या कसरती करतात. त्यातून दररोज किरकोळ वा गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. अनेकदा केवळ त्यांचे आयुष्य खटल्यांमध्ये उध्वस्त होऊ नये म्हणून पोलिस दुर्लक्ष करतात. 
हा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढीस लागून त्याचा उपद्रव युवती, महिलांनाही होऊ लागला. त्यामुळे त्यांना अटकाव घालण्याची जबाबदारी महिला पोलिस कर्मचारी श्रीमती एस.के.पवार, श्रीमती ए.आर.चौधरी यांच्यावर सोपवण्यात आली. त्यांनी अल्पावधीतच वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीने स्वतः:चा धाक निर्माण केला आहे. 

दंड नव्हे, केवळ धाक
सुसाट वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वार या महिला कर्मचाऱ्यांना पाहून गांगरून जातात. क्वचित अवसान आणणाऱ्या महाभागांनाही चौधरी व पवार यांनी वठणीवर आणले आहे. बाईक स्टॅंडवर लावून उतरणाऱ्या स्वारांना दंड भरावा लागेल अशी अपेक्षा असते. मात्र या दोघी त्यांना भर रस्त्यावर उठाबशा काढायला लावतात. ही अद्दल अशा सुसाट स्वारांना वठणीवर आणण्यास पुरेशी ठरते. शिरपूर बसस्थानकात तर या दोघींचा प्रवेशच पुरेसा ठरत असल्यासारखी परिस्थिती आहे. त्यांच्या धैर्याचे आणि कार्यपद्धतीचे शहरातून कौतुक केले जात आहे.

Web Title: women police pressure on people