मालेगाव महापालिकेत महिलाराज...मातब्बरांचे मनसुबे धुळीला 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

आरक्षण महिला राखीव निघाल्याने या इच्छुकांचे मनसुबे फेल ठरले आहेत. महापालिकेत मुळातच शिवसेना- भाजप स्थानिक पातळीवर विरोधात होते. विधानसभा निवडणुकीनिमित्त भुसे व गायकवाड यांचे मनोमिलन झाले. यानंतर महापालिकेत भाजप- शिवसेना युतीचा नवा अध्याय सुरू होईल अशी चर्चा असताना, राज्यपातळीवरच तीन दशकांच्या शिवसेना-भाजपमध्ये वितुष्ट निर्माण झाले. हे वितुष्ट टोकाला गेल्याने राज्यात नवे समीकरण आकाराला येणार आहेत. 

नाशिक : मालेगाव महापालिकेत महापौरपदासाठी ओबीसी महिला राखीव आरक्षण निघाल्याने अडीच वर्षांसाठी महिलाराज अवतरणार आहे. आरक्षण महिला राखीव निघाल्याने महापौरपदासाठी तयारी करणाऱ्या प्रमुख मातब्बरांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. निवडणुकीनंतरच्या पहिल्या टप्प्यातील महापौरपदाचा कार्यकाल 15 डिसेंबरला संपणार आहे. राज्यातील नवीन सत्ता समीकरणे पाहता कॉंग्रेस व शिवसेना युतीच्या महापौराला संधी असेल. राज्यात होणारा आघाडीचा प्रयोग शहरात अडीच वर्षांपूर्वीच महापौर निवडणुकीनिमित्त झाला आहे. 

विविध नावांची चर्चा सुरू

ओबीसी महिला राखीव आरक्षणामुळे कॉंग्रेसतर्फे माजी महापौर ताहेरा शेख, मंगला भामरे, महागटबंधन आघाडीतर्फे शानेहिंद निहाल अहमद, यास्मिन एजाज बेग, शिवसेनेतर्फे ज्योती भोसले, कल्पना वाघ, जिजाबाई बच्छाव, आशा अहिरे आदी नावांची चर्चा सुरू झाली आहे. या नावांसह अन्य काही इच्छुक पुढे येऊ शकतात. मात्र, महापौरपदासाठी लागणारी आर्थिक रसद वरील आठही इच्छुक महिलांकडे असल्याने याच नावांची चर्चा सुरू आहे. श्रीमती शेख यांनी यापूर्वी महापौरपद, तर श्रीमती भोसले यांनी उपमहापौरपद भूषविलेले आहे. राज्यात नवीन सत्ता समीकरण अस्तित्वात आल्यास पुन्हा कॉंग्रेसचा महापौर व शिवसेनेचा उपमहापौर होण्याची शक्‍यता आहे. मात्र, यंदा शिवसेनेकडूनही थेट महापौरपदासाठी बाजू मांडण्यात येण्याची शक्‍यता आहे. 

आरक्षण महिला राखीव निघाल्याने इच्छुकांचे मनसुबे फेल

महापौरपदासाठी सर्वसाधारण आरक्षण निघेल, अशी शक्‍यता लक्षात घेऊन यापूर्वी महागटबंधन आघाडीचे नबी अहमदुल्ला, एमआयएमचे गटनेते व विद्यमान स्थायी समिती सभापती डॉ. खालिद परवेज, भाजपचे सुनील गायकवाड, शिवसेनेचे जयप्रकाश बच्छाव, कॉंग्रेसचे फकिरा शेख, सलीम अन्वर आदी नावे चर्चेत होती. यातील नबी, डॉ. खालिद व गायकवाड यांनी चाचपणी सुरू केली होती. आरक्षण महिला राखीव निघाल्याने या इच्छुकांचे मनसुबे फेल ठरले आहेत. महापालिकेत मुळातच शिवसेना- भाजप स्थानिक पातळीवर विरोधात होते. विधानसभा निवडणुकीनिमित्त श्री. भुसे व गायकवाड यांचे मनोमिलन झाले. यानंतर महापालिकेत भाजप- शिवसेना युतीचा नवा अध्याय सुरू होईल अशी चर्चा असताना, राज्यपातळीवरच तीन दशकांच्या शिवसेना-भाजपमध्ये वितुष्ट निर्माण झाले. हे वितुष्ट टोकाला गेल्याने राज्यात नवे समीकरण आकाराला येणार आहेत. 

कॉंग्रेस- शिवसेना युतीला संधी 
पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक व जनता दल नगरसेवकांनी महागटबंधन आघाडी तयार केली आहे. आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल या आघाडीचे सर्वेसर्वा आहेत. मौलाना मुफ्ती यांनी प्रवेश केलेल्या एमआयएमच्या सात नगरसेवकांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. या दोघांची बेरीज बहुमताचा आकडा गाठू शकत नाही. महापालिकेत एकूण 84 सदस्य आहेत. महागटबंधनचे गटनेते बुलंद एक्‍बाल यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त आहे. 83 सदस्यांत कॉंग्रेसचे 29 व शिवसेनेचे 13 असे एकूण 42 सदस्य होतात. यामुळे ही आघाडी कायम राहिल्यास त्यांना महापौरपदाची संधी आहे. महापालिकेतील उर्वरित तिन्ही विरोधक एकत्र आले, तरी बहुमताचे गणित जुळत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women reservation in Malegaon Municipal Corporation