कुंझरच्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू? 

दीपक कच्छवा
गुरुवार, 5 जुलै 2018

आई गेल्याने भाऊ- बहीण झाले पोरके 
प्रियंकाला पाच वर्षाची मुलगी दिशा व तीन वर्षाचा मुलगा दादा आहे. प्रियंकाच्या जाण्याने भाऊ- बहीण आईच्या प्रेमाला पारखी झाली आहेत. प्रियंकांचे पती रामचरण बैरागी यांची चेन्नईला बदली झालेली होती. त्यामुळे पत्नी व मुलांना घेण्यासाठी ते 12 जुलैला येणार होते. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. या घटनेमुळे कुंझर गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चेन्नई येथे पती देशसेवचे कर्तव्य बजावत असताना दुसरीकडे सासरी कुंझर (ता. चाळीसगाव) येथे आलेल्या पत्नीला सासरच्यांनीच गळफास लावून ठार केल्याचा संशय विवाहितेचा नातेवाइकांकडून व्यक्त केला जात आहे. विवाहितेचा मृतदेह धुळे येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून याबाबत मेहुणबारे पोलिसांनी विवाहितेच्या दिराला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

याबाबत माहिती अशी, कुंझर (ता. चाळीसगाव) येथील सासर असलेली विवाहिता प्रियंका रामचरण बैरागी (वय 27) हिचे माहेर शिंदी (ता. भडगाव) येथील आहे. तिचे पती रामचरण बैरागी सैन्यदलात चेन्नई येथे कर्तव्यावर आहेत. प्रियंका या शिंदी आठ- दहा दिवसांपूर्वीच सासरी कुंझरला आली होती. यावेळी सासरी त्यांच्या सासू लीलाबाई बैरागी, आजेसासू (सासूच्या आई) सुमनबाई बैरागी, दीर प्रवीण बैरागी हे घरी होते. सासरे छगन बैरागी हा आपला ग्वाल्हेरला असलेल्या दुसऱ्या मुलाकडे गेले होते. 

मुलांचा रडण्याचा आला आवाज 
प्रियंका घरात मुलांसोबत एकटी झोपलेली होती. तिची सासू व आजेसासू बाहेर ओट्यावर तर दीर प्रवीण धाब्यावर झोपलेला होता. सकाळी सातच्या सुमारास घरातून मुलाच्या रडण्याचा आवाज आला. त्यावेळी आजीच घरात होती तर सासू बाहेर शौचाला गेलेली होती. मुलाच्या रडण्याचा आवाज येतच असल्याने आजीने घरात पाहिले असता, प्रिंयकाने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यामुळे आजीने आरडाओरड केल्यानंतर दीर प्रवीण धाब्यावरुन खाली आला. त्याने प्रियंकाला खाली उतरविले व तातडीने गावातील खासगी डॉक्‍टरांना दाखवले. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झालेला होता. 

ठार मारल्याचा संशय 
या घटनेची माहिती प्रियंकाच्या माहेरी शिंदी येथे समजताच माहेरच्या लोकांनी कुंझर गाठले. प्रियंकाच्या मामासह नातेवाइकांनी प्रियंकाला गळफास लावून ठार मारल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. घटनास्थळी मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप शिरसाठ व उपनिरीक्षक हेमंत शिंदे यांनी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी चाळीसगावला ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. याबाबत मळगाव (ता. भडगाव) येथील मयत प्रियंकाचे मामा मुरलीधर बैरागी यांनी दिलेल्या माहितीवरून सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास स्वतः दिलीप शिरसाठ हे करीत आहेत. 

शवविच्छेदन धुळ्याला 
प्रियंकाचे वडील विकास बैरागी व नातेवाइकांना सुरवातीलाच संशय आल्याने त्यांनी "आम्हाला प्रियंकाचे शवविच्छेदन धुळे येथे करायचे आहे' अशी विनंती पोलिसांना केली. पोलिसांनी ती मान्य करून धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्याय वैदिक प्रयोगशाळेत शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच खरे काय ते सत्य समोर येणार आहे. या घटनेची माहिती समजताच प्रभारी उप विभागीय पोलिस अधिकारी केशव पातोड यांनी देखील कुंझरला भेट दिली. मेहुणबारे पोलिस ठाण्यात ते तळ ठोकून होते. 

आई गेल्याने भाऊ- बहीण झाले पोरके 
प्रियंकाला पाच वर्षाची मुलगी दिशा व तीन वर्षाचा मुलगा दादा आहे. प्रियंकाच्या जाण्याने भाऊ- बहीण आईच्या प्रेमाला पारखी झाली आहेत. प्रियंकांचे पती रामचरण बैरागी यांची चेन्नईला बदली झालेली होती. त्यामुळे पत्नी व मुलांना घेण्यासाठी ते 12 जुलैला येणार होते. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. या घटनेमुळे कुंझर गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

या घटनेची आम्ही कसून चौकशी सुरू केली आहे. धुळे येथील शवविच्छेदन अहवालानंतरच खरे काय ते समोर येईल. त्यामुळे सध्या तरी आम्ही या घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 
- दिलीप शिरसाठ, सहाय्यक पोलिस निरीक्षक, मेहुणबारे

Web Title: women suspecious death in Chalisgaon