Women's Day 2019 : दवंडीवाल्या मीनाबाईंकडून पुरुषांची मक्तेदारी मोडीत!

Minabai Salve
Minabai Salve

कापडणे ः "ऐका हो ऐका... आपल्या गावात आज संध्याकाळी कार्यक्रम आहे. सर्व ग्रामस्थांनी होळी चौकात उपस्थित राहावे हो...!' अशी दवंडी ग्रामीण भागात आजही दिली जाते. यातून गावपण जोपासण्याची परंपरा आजही टिकून आहे. अशी दवंडी देणाऱ्या पुरुषांचे कणखर अन्‌ पहाडी आवाज गल्लोगल्ली घुमतात. मात्र, पुरुषांची मिरासदारी नगाव (ता. जि. धुळे) येथील एका महिलेने मोडीत काढली असून, गावात कोणत्याही प्रकारची दवंडी असो... त्या मोठ्या धिटाईने, स्पष्टपणे आणि कणखर आवाजात ग्रामस्थांपर्यंत माहिती पोहोचवतात. "दवंडीवाल्या मीनाबाई' म्हणूनच त्यांची ओळख बनली असून, खानदेशातील दवंडी देणाऱ्या त्या एकमेव महिला असल्याचे सांगितले जाते.

पती थकल्याने मिळाले काम
नगाव येथे पूर्वी विश्‍वास गुलाब साळवे हे दवंडी देण्याचे काम करीत असत. मात्र, आजारपणामुळे ते थकल्याने हे काम त्यांच्याकडून होईनासे झाले. त्यांनी दहा वर्षांपूर्वी हे काम थांबविले तेव्हा त्यांची मुलेही लहान असल्याने त्यांच्याकडून दवंडी देणे शक्‍य नव्हते. यामुळे पिढीजात दवंडी देण्याची ही परंपरा कोण चालवणार, असा प्रश्‍न निर्माण झाला. त्यावेळी विश्‍वास साळवे यांनी मीनाबाईंना "दवंडी तू दे. तुझा आवाज भक्कम आहे' असे सांगत पाठबळ दिले. या पाठबळातूनच मीनाबाईंनी दवंडी देण्यास सुरवात केली. अन्‌ त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. यामुळे मीनाबाई दहा वर्षांपासून दवंडी देण्याचे काम मोठ्या अभिमानाने आणि सफाईदारपणे करीत आहेत. या दवंडी देण्यातून खूप मोठी कमाई होते, असे नाही. एका दवंडीसाठी गावभर फिरावे लागते तेव्हा कोठे शंभर- दीडशे रुपये मिळतात. दवंडी देताना घशाला कोरडही पडते. त्रासही होतो. पण कुटुंबासाठी का होईना अल्पशा मानधनातून त्या हे काम त्या अविरत करीत आहेत.

राहण्यासाठी स्वतःचे घर नाही
साळवे कुटुंब मागासवर्गीय आहे. त्यांच्या दोन पिढ्या येथे खपूनही त्यांना स्वतःचे घर मिळालेले नाही. त्यांना चार मुलगे व दोन मुली आहेत. यामुळे कोणी घर देतं का घर अशी त्यांची विवंचना आहे. शासनाच्या विविध योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने साळवे मनस्ताप व्यक्त करतात. ग्रामपंचायतीने घरासाठी जागा द्यावी, दवंडी देणाराही कलावंतच आहे. त्यालाही पुरेसे मानधन मिळावे, अशी अपेक्षा मीनाबाईंनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com