World Tourism Day 2019 : पारदर्शी व्यवहाराचा पर्यटन व्यवसायाला फटका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

गेल्या दशकाच्या तुलनेत पर्यटकांची संख्या रोडावली आहे. पर्यटकांना पाणी, मार्गदर्शन, नाश्‍ता, जेवणासह अन्य सुविधा सहलीनुसार असतात. दरवर्षी होणाऱ्या सहलीसाठीच्या नोंदी यावर्षी झाल्या नाहीत. धनादेश किंवा ऑनलाइन पैसे देण्यास ग्राहक तयार नाहीत.
- मनोज लगडे संचालक, मानस हॉलिडेज केसरी टूर्सकरीता, धुळे

धुळे - नोटबंदीनंतर सर्वत्र ऑनलाइन पेमेंटमुळे आलेल्या पारदर्शीपणामुळे पर्यटन व्यवसायाला फटका बसला आहे. दिवाळी सुटीतील प्रवासाच्या नोंदणीसाठी अद्यापही ग्राहक फिरकत नसल्याने मोठ्या टूर कंपन्यांच्या सहली रद्द करण्यात येत आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी एकही नोंदणी झाली नसल्याने अडचणी वाढत आहेत. 

जिल्ह्यातून सिंगापूर, मलेशिया, थायलंड या देशांना भेट देणारे पर्यटक आहेत. तसेच देशांतर्गत पर्यटनासाठी ऑक्‍टोबर ते मार्च दरम्यान केरळ, एप्रिल ते जून दरम्यान हिमाचल प्रदेश, सिमला, कुलू मनाली, धर्मशाळा, उत्तरांचल, बद्रिनाथ, केदारनाथ, नैनिताल, मसुरी आदी ठिकाणांना भेट देतात. त्यादृष्टीने सहल कंपन्यांकडून नियोजन केले जाते. २००६ ते २०१२ या काळात पर्यटकांचा सहलीला जाण्याचा ओघ वाढलेला होता. मात्र २०१२ नंतर हा ओघ आटत गेला. त्याकाळात आठशेपर्यत होणारी नोंदणी गेल्यावर्षापर्यत अडीचशेवर थांबली. यावर्षी अद्याप नोंदणीही झालेली नाही. पूर्वीच्या अनुभवानुसार पर्यटक आपल्या सहलीसाठी प्रवासाची नोंदणी गणेशोत्सव काळात करत. 

गेल्या दशकात जिल्ह्यात चौधरी यात्रा कंपनी, केसरी टूर्स या दोन कंपन्यांची कार्यालये नोंदणी ठिकाणे होती. मात्र आता वीणा वर्ड, एसओसी, र्थामसपूर आदी कंपन्यांची नोंदणी कार्यालये सुरू झाली आहेत. चार वर्षापूर्वी चार लाखात अमेरिका वारी करणाऱ्यांना आता नऊ लाख मोजावे लागतात. त्यातही सर्व धनादेशाद्वारे पेमेंट घेतले जाते. त्यामुळे पर्यटक धनादेशाने पैसे देण्यास नकार देतात किंवा भीती वाटते. त्यामुळे नोंदणीला फटका बसला आहे. 

काश्‍मीर नाहीच
काश्‍मीरला जाण्यास पर्यटक उत्सुक असत. मात्र काही वर्षापासून त्या भागात पर्यटक जात नाहीत. त्यातच सध्याच्या अस्थिर राजकीय स्थितीत पर्यटक जाणे शक्‍य नाही. पर्यायाने यापूर्वी नियोजित केलेल्या अनेक सहली रद्द केल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Tourism Day 2019