तीन दिवसांच्या पतंगोत्सवाला येवलेकरांचा नेत्रदीपक रोषणाईने निरोप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

येवला - आज सायंकळी पतंगनगरीत जणू दिवाळीचा भास होत होता. आकाश नेत्रदीपक फटाक्‍यांच्या आतषबाजीच्या रोषणाईने उजळून गेले होते. निमित्त होते तीन दिवसांच्या पतंगोत्सवाला अलविदा करण्याचे. जेवढ्या धामधुमीत हा उत्सव साजरा झाला तितक्‍याच जोरदारपणे येवलेकरांनी त्याला निरोपही दिला.

येवला - आज सायंकळी पतंगनगरीत जणू दिवाळीचा भास होत होता. आकाश नेत्रदीपक फटाक्‍यांच्या आतषबाजीच्या रोषणाईने उजळून गेले होते. निमित्त होते तीन दिवसांच्या पतंगोत्सवाला अलविदा करण्याचे. जेवढ्या धामधुमीत हा उत्सव साजरा झाला तितक्‍याच जोरदारपणे येवलेकरांनी त्याला निरोपही दिला.

दोन दिवसांप्रमाणेच आज तिसऱ्या दिवशी दिवसभरही पतंगांची धूम सुरूच होती. मकरसंक्रांतीच्या भोगीपासून आज करीच्या दिवशी रात्री नऊपर्यंत शहरातील घरं, इमारतींच्या गच्ची आणि धाबे व्यापून गेले होते. मकरसंक्रांतीची कर म्हणजेच शेवटचा दिवस असल्याने आज अगदी तहान-भूक विसरून येवलेकर उशिरापर्यंत गच्चीवरून खाली उतरलेच नाहीत. या उत्सवाच्या निरोपासाठी पतंगवेड्या येवलेकरांकडून परंपरेप्रमाणे अंधारात विविधरंगी लक्षवेधी फटाक्‍यांची आतषबाजी, रोषणाई होतांना शेकडो दिवेही भिरभिरताना डोळे दीपून तर गेलेच; पण गल्लीबोळांत, गच्चीवरून जोरदार फटाक्‍यांची आतषबाजी होत असल्याने अंधारात आसमंतही उजळून गेला होता. परंपरेनुसार मजा अन्‌ मनमुराद आनंद लुटताना शौकीनांनी शानदार निरोप दिला. कुटुंबांबरोबर पतंगोत्सवाचा आनंद लुटत भोगी, संक्रांत आणि कर तिन्ही दिवशी येवलाप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले होते. मुंबई, पुणे, नगर, नाशिक यांसह गुजरात, मध्य प्रदेश, इतर राज्यांतील अनेक पतंगशौकीनांची हजेरी महोत्सवाचे वेगळेपण अधोरेखित करून गेले. आज उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. राहुल खाडे यांनीदेखील येथे येऊन पतंग उडविण्याचा आनंद लुटला.

उत्साह... पतंग मिळविण्याचा!
‘घरांवर माणसे... तर आकाशात पतंग’ हे समीकरण असले, तरी आकाशाप्रमाणेच जमिनीवरही एक स्पर्धा सुरू असते, ती म्हणजे पतंग मिळविण्याची! भरारी मिळालेला पतंग काटाकाटीच्या स्पर्धेत कटतोच. असे हजारो पतंग कटतात. साधारणतः एक-दोन रुपयांचा पतंग; पण तो मिळविण्यासाठी युवकांचा उत्साह नजरेत भरणारा होता. पतंग पडताना दिसला, की हातात शेकोटा (बांबूला काटेरी फांदी बांधलेली) घेऊन युवक त्यामागे धावत, त्यासाठीची धावपळ, वाद, पतंग मिळाल्याचा आनंद अन्‌ पुन्हा नव्या पतंगाचा शोध! हे सर्व कुतूहलजनकच होते. पतंगाप्रमाणेच मांजाही जमा केला जातो अन्‌ त्यावरच पुन्हा नवा पतंगोत्सव सुरू होतानाचे चित्र गेले तीन दिवस विनावाद शहरभर सुरू होते.

Web Title: yeola kite festival