रविवारच्या ‘चकटफू’ ऑफरला ‘बीएसएनएल’चा विराम

संतोष विंचू
सोमवार, 29 जानेवारी 2018

येवला - मोबाईलमुळे कमी होत चाललेल्या लॅंडलाइन ग्राहकांची संख्या रोखण्यासाठी ‘बीएसएनएल’ने वर्षापूर्वी प्रत्येक रविवारी दिवसभर ग्राहकांना फ्री कॉलिंगची दिलेली ऑफर अखेर गुंडाळली. रोज रात्री किमान दहा तास फ्री बोलण्याच्या योजनेचे रात्रीचे मोफत बोलण्याचे तासही घटविले आहेत.

येवला - मोबाईलमुळे कमी होत चाललेल्या लॅंडलाइन ग्राहकांची संख्या रोखण्यासाठी ‘बीएसएनएल’ने वर्षापूर्वी प्रत्येक रविवारी दिवसभर ग्राहकांना फ्री कॉलिंगची दिलेली ऑफर अखेर गुंडाळली. रोज रात्री किमान दहा तास फ्री बोलण्याच्या योजनेचे रात्रीचे मोफत बोलण्याचे तासही घटविले आहेत.

मोबाईलमुळे अनेकांनी घरातील लॅंडलाइन बंद करण्याचा दोन-तीन वर्षांपासून सपाटा लावल्याने ‘बीएसएनएल’ने धडाकेबाज ऑफर सुरू केल्या होत्या. ग्राहक आपल्या लॅंडलाइनकडे आकृष्ट होण्यासाठी बीएसएनएलने सर्वप्रथम रोज रात्री नऊनंतर सकाळी सातपर्यंत इतर सर्व नेटवर्कवर केले जाणारे सर्व कॉल मोफत दिले होते. यासोबतच रविवारी दिवसभर घरातील लॅंडलाइनवरून अगदी चकटफू बोलण्याची ऑफरदेखील मागील वर्षापासून सुरू केली होती; परंतु मोबाईल कंपन्यांनी इतक्‍या योजना सुरू केल्या, की ग्राहक दिवसरात्र अनलिमिटेड फ्री बोलू लागल्याने लॅंडलाइनची ही योजना फारशी प्रभावी ठरली नाही. त्यामुळे ही योजना गुंडाळण्याची नामुष्की बीएसएनएलवर वर्ष-दीड वर्षातच आली. आपल्या ग्राहकांना मेसेज पाठवून याची पूर्वकल्पना दिली जात आहे. आता नव्याने रविवारी लॅंडलाइनवर होणारे सर्व नेटवर्कवरचे फ्री कॉल बंद करण्याचा निर्णय बीएसएनएलने घेतला. १ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल.

आजचा (ता. २८) रविवार ग्राहकांसाठी मोफत बोलण्याचा शेवटचा रविवार ठरला. याशिवाय रोज रात्रीच्या फ्री कॉलमध्येदेखील कपात करून आता रात्री साडेदहापासून तर सकाळी सहापर्यंतच ग्राहकांना मोफत बोलता येईल. रात्रीच्या फ्री कॉलिंग वेळेत अडीच तासांची कपात केली.

‘बीएसएनएल’ची फोर-जी सेवा कधी?
‘जिओ’ने दिलेल्या फोर-जीच्या ऑफर ग्राहकांना विनाजाहिराती खेचत आहेत. बीएसएनएल मात्र या स्पर्धेत अजूनही खूप मागे का?, याचे उत्तर मिळत नाही. सरकारी कंपनी असूनही अजूनही बीएसएनएलने फोर-जी सेवा दिलेली नसल्याने इंटरनेट वापरण्यासाठी हे कुचकामी ठरत आहे. त्यामुळे अनेक जण असलेले जुने नंबर इतर कंपन्यांत पोर्ट करत आहेत.

Web Title: yeola news bsnl chakfoot offer