येवला दुष्काळग्रस्त नाही ; सरकारचा जावईशोध !

येवला दुष्काळग्रस्त नाही ; सरकारचा जावईशोध !

येवला : जो खराच दुष्काळी तालुका आहे. तोच यादीतून वगळला आहे. येवला दुष्काळग्रस्त नसल्याचा सरकारने लावलेला जावईशोध आहे. दुष्काळग्रस्तच्या यादीतून तालुक्याला वगळल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी असून, भरडलेल्या शेतकऱ्यांवर हा मोठा अन्याय आहे. यामागे मोठे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप प्रहार शेतकरी संघटनेने केला.

तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. निवेदनाची प्रत तहसीलदार रोहिदास वारुळे यांना देण्यात आली आहे. तालुक्याची पाहणी करून वास्तवानुसार शनिवार (दि.२७) पर्यंत तालुका दुष्काळी जाहीर करुन उपाययोजना न केल्यास प्रहार शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातून जाणारे चारही दिशांच्या महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ महाजन यांनी दिला आहे.

या निवेदनावर प्रहार शेतकरी संघटनेचे वसंतराव झांबरे, भागीनाथ गायकवाड, भाऊसाहेब कदम, हितेश दाभाडे, किरण दाभाडे, रावसाहेब आहेर, नवनाथ लभडे, जलहक्क संघर्ष समितीचे भागतवराव सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

तालुक्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती असून राजापूर, अंदरसूल, नगरसूल या महसूल मंंडलातील संपूर्ण खरीप वाया गेला आहे. कित्येक गावात पेरण्या झालेल्या नाहीत. जिथे पेरण्या झालेल्या आहेत, तिथे काही उगवलेच नाही. त्यामुळे सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळांच्या सर्वच निकषात पात्र असतांना केवळ नागपूर मध्ये बसून काही अधिकार्‍यांनी व राजकीय लोकांनी तालुक्यात दुष्काळ नसल्याचा अहवाल तयार केला आहे. रिमोट सेसींग द्वारे, उपग्रहाद्वारे पाहणी करुन दुष्काळ जाहीर करण्याच्या कार्यपद्धतीला प्रहार संघटनेने तीव्र आक्षेप घेतला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीच्या माहितीवर गावातील दुष्काळी निकष ठरविण्याच्या प्रक्रियेचा तीव्र निषेध केला आहे. महसूल व कृषी विभागाच्या पाहणीवर तसेच गावोगावची स्थानिक पर्जन्यमान स्थिती, साठवण तलावातील पाणी, पाझर तलावाचे सद्याचा साठा, भुजल पातळी आदी निकषांवर दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशीही या निवेदनात केली आहे.

"चुकीच्या निकषांवर तालुके निश्चित केल्याने प्रचंड भयावह दाहकता असताना येवल्याचे नाव दुष्काळी यादीत नाही. तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला अशी माहिती पुरवण्यात आली आहे. वस्तुत: ही माहिती येवला शहरात असलेल्या महसूल मंडळाच्या पर्जन्यमापकावरुन घेतली आहे.त्यामुळे केवळ शहरासह नजीकच्या गावचा पाऊस गृहित धरुन येवल्याला दुष्काळ यादीतून वगळले.

पर्जन्यमानाच्या निकषानुसार अंदरसूल व नगरसूल मंडळातील प्रत्येक गाव आज दुष्काळी आहे. येथे भीषण पाणीटंचाई, चाराटंचाई होणार असून दिवसेंदिवस शेतकर्‍यांचा रोष वाढत जाणार आहे. शासनास व प्रशासनास होणारी आंदोलने आणि शेतकर्‍यांचा असंतोष यांना सामोरे जावे लागणार आहे. त्या आधीच आवश्यक उपाययोजना कराव्यात."

- भागवतराव सोनवणे, संयोजक,जलहक्क संगर्ष समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com