पातोंड्यातील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - पातोंडा (ता. चाळीसगाव) येथील तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून स्वतःच्या शेतातील लिंबूच्या बागेत विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल (ता. 18) सायंकाळी चारला उघडकीस आली. याबाबत आज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुनील विक्रम पाटील (वय 30) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - पातोंडा (ता. चाळीसगाव) येथील तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून स्वतःच्या शेतातील लिंबूच्या बागेत विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल (ता. 18) सायंकाळी चारला उघडकीस आली. याबाबत आज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुनील विक्रम पाटील (वय 30) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

सुनील पाटील यांच्या कुटुंबाची सुमारे आठ एकर शेती आहे. त्यांचा मोठा भाऊ अपंग असल्याने सुनील हेच घरातील कर्ते होते. काल (ता. 18) त्यांचे वडील विक्रम पाटील हे नेहमीप्रमाणे सकाळी शेतातून दूध घेऊन घरी आले. त्यानंतर "शेतातील कपाशीच्या काड्या जाळण्यासाठी जातो', असे सांगून सुनील शेतात गेले. गावात दुपारी लग्न असल्याने सुनील लग्नाला परस्पर गेला असावा म्हणून त्यांच्या घरच्यांनी त्यांचा तपास केला नाही. दुपारी तीनपर्यंत ते घरी न आल्याने वडील शेतात शोधण्यासाठी गेले. तेथे लिंबूच्या बागेत सुनील बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने चाळीसगावला ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्यांना डॉक्‍टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. 

आधारच हरपला 
सुनील हे घरातील कर्ते असल्याने त्यांच्या मृत्यूने कुटुंबाचा आधारच हरपला आहे. त्यांच्यावर गावातील विकास सोसायटीचे 1 लाख 22 हजार व इतर खासगी तीन ते चार लाखांचे कर्ज होते. शेतीचे पाहिजे तसे उत्पन्न न निघाल्याने कर्ज फेडावे तरी कसे, या विवंचनेत ते होते असे वडील विक्रम पाटील यांनी सांगितले. या नैराश्‍यातूनच सुनील यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्यावर आज सकाळी दहाला अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनील यांच्या पश्‍चात आई- वडील, पत्नी, दोन मुली व दीड वर्षांचा मुलगा व भाऊ असा परिवार आहे. 

बाग वाचविण्यासाठी धडपड 
सुनील पाटील यांनी एक एकरवर लिंबूंची लागवड केली होती. त्यांच्या शेतातील विहिरींनी तळ गाठल्यामुळे ती पंधरा ते वीसच मिनिटे चालायची. त्यामुळे शेतातील लिंबूंची झाडे वाचविण्यासाठी सुनील यांची धडपड सुरू असायची. पैसा खर्च करूनही वाढत्या तापमानामुळे उत्पन्न येण्याची आशा नसल्याने त्यांना नैराश्‍य आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

Web Title: Young farmers commit suicide