डंपरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

महामार्गावर पुन्हा बळी; नोकरीच्या पहिल्याच दिवशी ओढवला प्रसंग
जळगाव - नोकरीच्या पहिल्याच दिवशी ड्यूटी पूर्ण कंपनीतून घरी परतणाऱ्या तरुणाचा समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने धडक देत जीव घेतला. गिरणा गार्डन हॉटेलजवळ दुपारी साडेचारला घडलेल्या या घटनेत तरुणाचा डोक्‍यावरून डंपरचे मागील चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांपासून महामार्गावरील अपघातांमध्ये बळी जाण्याचे सत्र सुरू असताना त्यात या घटनेने दुर्दैवी भर घातली आहे. 

महामार्गावर पुन्हा बळी; नोकरीच्या पहिल्याच दिवशी ओढवला प्रसंग
जळगाव - नोकरीच्या पहिल्याच दिवशी ड्यूटी पूर्ण कंपनीतून घरी परतणाऱ्या तरुणाचा समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने धडक देत जीव घेतला. गिरणा गार्डन हॉटेलजवळ दुपारी साडेचारला घडलेल्या या घटनेत तरुणाचा डोक्‍यावरून डंपरचे मागील चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांपासून महामार्गावरील अपघातांमध्ये बळी जाण्याचे सत्र सुरू असताना त्यात या घटनेने दुर्दैवी भर घातली आहे. 

प्रत्यक्षदर्शी व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोजोरे (ता. भुसावळ) येथील हेमंत भास्कर दोडे (वय २४) याने पंधरा दिवसांपूर्वी बॉश कंपनीत मुलाखत दिली होती. दोन दिवसांपूर्वी नोकरी लागून हेमंतच्या कंपनीतील कामाचा आज पहिला दिवस होता. फर्स्ट शिपसाठी (सकाळी ८ ते ४) सकाळीच घरून जळगावला दुचाकीवर आला होता.  दुपारी तीनला ड्यूटी संपल्यानंतर कंपनीने गणवेश, बूट, गॉगल हेमंतला दिले. ते घेऊन हेमंत कंपनीतून दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी आपल्या दुचाकीने (क्र. एमएच १९ सीबी ८१६४) घरी जाण्यासाठी निघाला. राष्ट्रीय महामार्गावरील गिरणा नदीच्या पुलाजवळ काही अंतरावर समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने हेमंतला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरून डंपरचालक फरार झाला. दहा मिनिटे मृतदेह तसाच रस्त्यावर पडून होता. काही वेळातच जैन इरिगेशन कंपनीच्या रुग्णवाहिका घटनास्थळावर येऊन मृतदेह उचलून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला. 

हेमंतला मित्रांनी ओळखले
हेमंतच्या मागून ड्युटीवरून घरी परतणाऱ्या दीपक गोरख कोळी व चेतनकुमार सोनवणे यांना घडलेला अपघात दिसला. 

कोणाचा अपघात झाला हे बघितला असतात अपघातात आपला मित्रच असल्याचे दिसले. घटनेची माहिती हेमंतच्या कुटुंबीयांना ताबडतोब सांगून पोलिसांना संपर्क साधला. 

घरची परिस्थिती नाजूक
हेमंतचे वडील भास्कर दोडे यांची शेती असून त्यातून आपला उदरनिर्वाह करतात. हेमंत तीन भावंडांत मोठा असल्याने मोलमजुरी करून आयटीआयपर्यंत शिक्षण पूर्ण करून वडिलांना घर चालविण्यासाठी
हातभार लावत होता. पंधरा दिवसापूर्वी बॉश कंपनीत मुलाखत देवून त्याला नोकरी लागल्याने घरात आनंद होता. मात्र नोकरीच्या पहिल्या दिवशी मुलाने जीव गमाविल्याने दोडे कुटुंबीयांवर आभाळ कोसळले.  

कुटुंबीयांचा रुग्णालयात आक्रोश
हेमंतची ओळख पटल्यानंतर कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. कुटुंबीयांनी लागलीच जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. यावेळी हेमंतच्या मृत्यूचे कळाल्याने कुटुंबीयांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. त्यांच्या पश्‍चात वडील, आई, लहान भाऊ, बहीण असा परिवार आहे.

हेल्मेट असते तर...वाचला असता
जिल्हा पोलिस दलातर्फे गेल्या दीड-दोन महिन्यांभरापूर्वी महामार्गावर हेल्मेट सक्ती केली होती. परंतु, पोलिसांची कारवाई थंड झाल्याचे दिसून येत आहे. आज झालेल्या अपघातात डंपरने हेमंतच्या दुचाकीला धड दिली. धडक लागताच दुचाकी रस्त्याच्या कडेला पडली पण हेमंत रस्त्यावर पडून डंपरचे चाक डोक्‍यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हेमंतच्या डोक्‍यात जर हेल्मेट असते तर कदाचित त्याचा जीव आज वाचला असता, अशीही चर्चा अपघातस्थळी सुरू होती. 

सैन्यात भरती व्हायचे होते..
हेमंतसोबतचे अनेक मित्र हे बीएसफ, आरपीएफमध्ये होते. त्यामुळे सैन्यात भरती होण्याची आवड होती. त्याने त्यांच्या गाडीवर बीएसएफदेखील लिहिले होते. दोन दिवसांपूर्वीच बॉश कंपनीत नोकरी लागल्याने तो आजपासून कामावर रुजू झाला होता. अपघाती मृत्यूने त्याचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न भंगले.

महामार्ग बनला मृत्यूचा सापळा
गेल्या तीन-चार महिन्यात महामार्गावर घडलेल्या अपघातात अनेकांनी आपला जीव गमावलेला आहे. या महामार्गाची दुरुस्ती, समांतर रस्ते तसेच साईडपट्ट्या करण्यासाठी जळगावकरांनी पदयात्रा, आंदोलन, जाहीर सभा घेऊन देखील रस्त्याचे कामाला प्रत्यक्षात अजून सुरवात झालेली नाही. त्यामुळे कधी या महामार्गाचा मृत्यूचे जाळ्यातून सुटका होते असे नागरिकांना आता वाटू लागले आहे. 

Web Title: youth death in accident