जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी "राष्ट्रवादी'चीही मोर्चेबांधणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

नाशिक - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर कुठल्याच एका पक्षाला बहुमत मिळाले नाही, तसेच शिवसेना व भारतीय जनता पक्षातील संबंध ताणल्यामुळे अनिश्‍चिततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सत्तेचे गणित जुळविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही मोर्चेबांधणीस सुरवात करून या अनिश्‍चितेचा फायदा उठविण्याचा निर्णय घेतला आहे. 

नाशिक - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर कुठल्याच एका पक्षाला बहुमत मिळाले नाही, तसेच शिवसेना व भारतीय जनता पक्षातील संबंध ताणल्यामुळे अनिश्‍चिततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सत्तेचे गणित जुळविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही मोर्चेबांधणीस सुरवात करून या अनिश्‍चितेचा फायदा उठविण्याचा निर्णय घेतला आहे. 

जिल्हा परिषदेत मागील निवडणुकीत 27 जागांवर विजय मिळवून राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. या वेळी "राष्ट्रवादी'ची नऊ जागांनी पीछेहाट झाल्याने विरोधी पक्षात बसण्याची "राष्ट्रवादी'च्या नेत्यांची मानसिकता झाली होती. मात्र, मुंबई महापालिकेच्या निकालानंतर महापौर कुणाचा, या मुद्यावरून शिवसेना व भाजप यांच्यात रोजच नवीन वाद होत असल्याने नाशिकमध्ये भाजप व शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, याबाबत निश्‍चित काहीही सांगितले जाऊ शकत नाही. शिवसेनेच्या नेत्यांनीही भाजपशिवाय सत्ता स्थापन करता येते का, याबाबत चाचपणी सुरू केली आहे. अशा अस्थिरतेच्या परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनीही जुळवाजुळव करण्यासाठी पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. "राष्ट्रवादी' कुणाबरोबर आघाडी करणार, याचा निर्णय प्रदेश स्तरावरून ठरणार असला, तरी आपले संख्याबळ वाढविण्यासाठी त्यांनी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून "राष्ट्रवादी'च्या नवनिर्वाचित सदस्या अमृता पवार यांनी पठावे दिगर गटातून अपक्ष निवडून आलेले गणेश अहिरे यांना "राष्ट्रवादी'चे सहयोगी सदस्यत्व देऊन पक्षाची सदस्य संख्या 19 केली आहे. 

अमृता पवार, बनकर दावेदार? 
गणेश अहिरे "मविप्र'चे कर्मचारी असल्याने त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे वळविणे सहज शक्‍य झाल्याचे बोलले जाते. यामुळे अमृता पवार यांच्या नेतृत्वाची चुणूक दिसून आली आहे. सत्तेचे गणित जुळविण्यात "राष्ट्रवादी' मागे असताना आज अमृता पवार यांनी एका अपक्षाला पक्षाचे सहयोगी सदस्यत्व देऊन "राष्ट्रवादी'ही सत्तेच्या स्पर्धेत असल्याचे दाखवून दिले. शिवसेना व भाजपची युती झाली नाही, तर शिवसेना- कॉंग्रेस व भाजप- राष्ट्रवादी असे समीकरण जुळणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. त्या परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मंदाकिनी बनकर व अमृता पवार अध्यक्षपदाच्या दावेदार मानल्या जात आहेत. मागील वेळी मंदाकिनी बनकर यांची अध्यक्षपदाची संधी हुकल्याने या वेळी संधी मिळण्याची त्यांची अपेक्षा आहे. अर्थात, मुंबईच्या महापौर निवडणुकीनंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. 

Web Title: ZP president ncp raised