विद्यार्थ्यांना घरपोच दाखले देऊन शाळा बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

इगतपुरीसारख्या आदिवासी तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना घरपोच दाखले देऊन शाळा बंद केल्याचा अजब प्रकार मानवेढे (मौजे कामडवाडी) येथील जिल्हा परिषद शाळेत सुरू आहे. शाळेची पटसंख्या शून्य दाखवून आदिवासी विद्यार्थ्यांसह पालकांची फसवणूक केल्याचे निवेदन गटशिक्षणाधिकारी प्रतिभा बरडे यांना जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे व शेतकरी नेते बाळासाहेब धुमाळ यांनी कामडवाडी ग्रामस्थांनी मंगळवारी दिले.

इगतपुरी शहर - इगतपुरीसारख्या आदिवासी तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना घरपोच दाखले देऊन शाळा बंद केल्याचा अजब प्रकार मानवेढे (मौजे कामडवाडी) येथील जिल्हा परिषद शाळेत सुरू आहे. शाळेची पटसंख्या शून्य दाखवून आदिवासी विद्यार्थ्यांसह पालकांची फसवणूक केल्याचे निवेदन गटशिक्षणाधिकारी प्रतिभा बरडे यांना जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे व शेतकरी नेते बाळासाहेब धुमाळ यांनी कामडवाडी ग्रामस्थांनी मंगळवारी दिले. 

मानवेढेच्या मौजे कामडवाडी येथे गेल्या १५ वर्षांपासून जिल्हा परिषद शाळा पहिली ते चौथीपर्यंत सुरू आहे. मात्र, या ठिकाणी नियुक्‍त शिक्षक मुलांचे दाखले अंगणवाडीसेविकेच्या हस्ते घरपोच देत शाळा बंद करीत आहेत. श्रावण डोके, काळू कामडी, पांडुरंग आगीवले, राजेंद्र वीर, घुगर वीर, शांतीबाई डोके, कविता भले, मीनाबाई पोकळे, सुलाबाई वीर, मंदाबाई कामडी, शेवंताबाई खडके, कविता डोके, लताबाई आगीवले, सुमन आगीवले आदी उपस्थित होते.

संबंधित शिक्षक, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांनी फसवणूक केल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

घडलेल्या प्रकारात संबंधित शाळेतील शिक्षकांची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल. शाळा बंद होऊ देणार नाही.
- प्रतिभा बरडे, गटशिक्षणाधिकारी

अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेचे बहुतांशी शिक्षक शाळांची पटसंख्या कमी दाखवून आपली बदली सोयीनुसार व मर्जीच्या ठिकाणी व्हावी म्हणून असे कृत्य करतात. अशा शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा.
- बाळासाहेब धुमाळ, शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zp School Close