
विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या आहेत.
आमदार आराधना मिश्रा सांभाळणार काँग्रेस विधिमंडळाची कमान
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly Election) प्रतापगड जिल्ह्यातील रामपूर खास मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदार आराधना मिश्रा (Aradhana Mishra) उर्फ मोना या पुन्हा एकदा काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्या असणार आहेत. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल (K C Venugopal) यांनी आराधना यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी त्यांची उत्तर प्रदेश काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती केल्याची माहिती दिली. आराधना या गेल्या विधानसभेत काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या नेत्या राहिल्या आहेत.
2017 मध्ये भारतीय जनता पक्षानं (BJP) पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन केल्यानंतर, अजय कुमार लल्लू यांना कॉंग्रेस (Congress Party) विधिमंडळ पक्षाचे नेते बनविण्यात आलं होतं. परंतु, नंतर त्यांची प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ही जबाबदारी आराधना यांच्याकडं सोपविण्यात आली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील 403 जागांपैकी काँग्रेसनं फक्त सात जागा जिंकल्या होत्या. यावेळी अजय कुमार लल्लू यांचा कुशीनगर जिल्ह्यातील तमकुहिराज येथून भाजपच्या डॉ. असीम कुमार यांच्याकडून पराभव झाला. नंतर त्यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला.
हेही वाचा: उत्तर प्रदेश विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी अखिलेश यादव यांची निवड
यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या, त्यात प्रतापगडच्या रामपूर खास जागेवरून आराधना पुन्हा निवडून आल्या आहेत, तर महाराजगंज जिल्ह्यातील फरेंदा मतदारसंघातून विजयी झालेले वीरेंद्र चौधरी हे काँग्रेसचे दुसरे आमदार आहेत. चौधरी यांनी पहिल्यांदाच निवडणूक जिंकलीय, तर आराधना तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. आराधना यांचे वडील प्रमोद तिवारी हे देखील दीर्घकाळ काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते होते.
Web Title: Aradhana Mishra Again Elected Leader Of Up Congress Legislature Party Rampur Khas
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..