आमचे काम आंदोलनाचे : टिकैत

राकेश टिकैत यांनी ‘व्होट पे चोट’ म्हणत उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपला विरोध करण्याचा निर्धार केला होता.
राकेश टिकैत
राकेश टिकैतsakal media

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांवरून आंदोलन करणारे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी ‘व्होट पे चोट’ म्हणत उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपला विरोध करण्याचा निर्धार केला होता. परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांचा गृहजिल्हा असलेल्या मुझफ्फरनगरमध्येच भाजपची सरशी झाली. त्यानंतर टिकैत यांनी नरमाईची भूमिका घेत, ‘आमचे काम आंदोलनाचे होते. शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडले. आता ज्यांचा विजय वा पराभव झाला, त्यांनी त्याचा विचार करावा. आमचे आंदोलन सुरू राहील,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीलगतच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केले. केंद्र सरकार आंदोलनकर्त्यांची दखल घेत नाही म्हणून भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत आव्हान देण्याची भूमिका या आंदोलनाने घेतली होती. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक समोर असताना मुझफ्फरनगर आणि लखनौ येथे शेतकऱ्यांची महापंचायत घेण्यात आली. तेथे सर्वच शेतकरी आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि योगी आदित्यनाथ यांना हरविण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते.

ज्या पश्‍चिम उत्तर प्रदेशमध्ये जाट आणि शेतकऱ्यांचे वर्चस्व असल्याचे मानले जाते, तिथेच भाजपची सरशी झाली आहे. शामली, मुझफ्फरनगर, बागपत, हापूड, बुलंदशहर, मथुरा यांसारख्या जिल्ह्यांमधील मतदारसंघात भाजपने वर्चस्व दाखविले. याबद्दल टिकैत यांनी खासगी वाहिनीला मुलाखत दिली. त्यात त्यांना देखील नेमके विश्‍लेषण करता आलेले नाही. ते म्हणतात, ‘‘आमच्याकडे शेतकऱ्यांचे प्रश्‍न आहेत. या आंदोलनामुळे किमान राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्‍न तर आले. तेच आम्हाला हवे होते.’’

‘‘राजकीय पक्षांना निवडणुकीत मते कसे मिळवायची हे माहिती आहे. आम्हाला मतांबद्दल बोलायचे असते, तर आम्ही निवडणुकीत उतरलो असतो. आम्ही निवडणूक लढविली नाही. त्यामुळे मतांचे राजकारण आणि आंदोलन याचा वेगवेगळा विचार करावा लागेल. राजकीय पक्षांनी या निवडणुकीतील विजय आणि पराभवाचा विचार करायचा आहे. आमचे काम आंदोलनाचे आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबरोबर आहोत. त्यांच्याबरोबर आम्ही पुढेही राहू,’’ असे टिकैत यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com