
UP Election 2022 : युपी’त भाजप पराभवाच्या वाटेवर
वाराणसी: उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही सहभागी झाल्या आहेत. समाजवादी पक्षासाठी प्रचार करताना त्यांनी भाजपचा पराभव जवळ आल्याचे वक्तव्य केले. स्वत:ला लढाऊ अशी उपमा देताना त्यांनी भाजप कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोपही केला.
हेही वाचा: Uttar Pradesh BJP | उत्तर प्रदेशमध्ये भाजपला आणखी धक्का ! पाहा व्हिडीओ
बॅनर्जी म्हणाल्या, की मी काल विमानतळावरून दशाश्वमेध घाटावर जात असताना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मध्येच माझी मोटार थांबविली. माझ्या मोटारीवर त्यांनी हल्ला केला तसेच मला ढकलून परत जा, असे बजावले. भाजप कार्यकर्त्यांच्या मेंदूत हिंसाचाराशिवाय काहीही नसते. ते उत्तर प्रदेशातील सत्ता गमवत आहेत. भाजपचा पराभव अगदी जवळ आला आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून मला शिवीगाळ केली जात असताना मी माझ्या मोटारीतून उतरले आणि हल्लेखोर काय करू शकतात, हे पाहण्यासाठी काहीवेळ शांतपणे उभा राहिले. भाजप कार्यकर्ते काय करू शकतात. त्यांच्यात किती ताकद आहे, हे पाहण्याची माझी इच्छा होती. मात्र, ते घाबरट आहेत. या हल्ल्याबद्दल उलट मी त्यांचे आभारच मानले. त्यांच्या या हल्ल्यातून उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव होत आहे, हाच संदेश गेला. अन्यथा, त्यांनी माझ्यावर हल्ला का केला असता, त्यामुळेच, मी त्यांचे आभार मानले, असेही त्यांनी नमूद केले. गेल्यावर्षी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत वापरलेल्या बांगलाभाषेतील घोषणेचा हिंदीत अनुवाद करत हा हे इतकं सोपे नाही, खेळ आता सुरू झाला आहे (खेला होगा), असेही ममता बॅनर्जी यांनी नमूद केले.
हेही वाचा: Uttar pradesh : नोएडात इलेक्ट्रॉनिक पार्क
मी घाबरट नसून धाडसी आहे. प्रदीर्घ काळापासून संघर्ष केला आहे. भूतकाळात पश्चिम बंगालमध्ये माकपने माझ्यावर हल्ला केला होता. अनेकवेळा माझ्यावर काठ्यांनी हल्ला करण्यात आला. त्याचप्रमाणे, गोळीबारही केला गेला. इतके हल्ले होऊनही मी कधीही झुकले नाही, असेही बॅनर्जी यांनी सांगितले.
मी एका राजकीय बैठकीसाठी उत्तर प्रदेशात आले आहे. माझ्या येण्याचा भाजपला एवढा त्रास का होतो, याचे मला आश्चर्य वाटते. केवळ एकदा उत्तर प्रदेशात आल्यामुळे भाजपचा पराभव निश्चित होत असेल तर मी हजारोवेळा या राज्यात येईन.
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल
‘जय श्री राम चा उद्घोषावर असंतोष व्यक्त केल्याने लोकांना तो करण्यापासून थांबवता येणार नाही. लोक काशीत ‘हर हर महादेव’ व मथुरा-वृंदावनमध्ये ‘राधे राधे’, ‘जय श्री कृष्णा’चा जयघोष करतील. उत्तर प्रदेशचे पश्चिम बंगालमध्ये रूपांतर करण्याचे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. उत्तर प्रदेशात पुन्हा कमळ फुलेल.
Web Title: Up Election 2022 Bjp Verge Defeat Up
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..