UP Election : भाजपसाठी पाचवा टप्पा अधिक नुकसानकारक?

हिंदुत्व, राम मंदिरचे मुद्दे मागे; शेतकरी आंदोलनाचा फटका शक्य
UP assembly Election
UP assembly ElectionSakal

लखनौ: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. पाचव्या टप्प्यासाठी रविवारी (ता.२७) मतदान झाले. आता केवळ दोन टप्पे उरले असून देशातील या सर्वांत मोठ्या राज्यात शहा-मोदी यांचा करिष्मा दिसणार का?, योगी सरकार पुन्हा सरकार सत्तेवर येणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

२०१७च्या निवडणुकीपेक्षा यंदा भाजपची कामगिरी काहीशी खालवणार असल्याचे खासगीत बोलले जात आहे. असे असेल तर भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात का? आणि त्यांचा प्रतिस्पर्धी समाजवादी पक्षाला (सप) पुढे चाल मिळू शकते का?, हा अति मोलाचा प्रश्‍न निर्माण होतो.

निवडणूक कठीण आहे, हे भाजप आणि ‘सप’ हे दोन्ही पक्ष मान्य करतात. उत्तर प्रदेश विधानसभेच्या ४०३ जागांपैकी भाजपने २०१७ मध्ये ३१२ जागा जिंकत नवा विक्रम प्रस्थापित केला. त्यावेळी ‘सप’ला केवळ ४७ जागांवर समाधान मानावे लागले होते. यामुळे या पक्षासाठी यंदाची वाट सोपी नाही. त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी ४७वरून २०२चा ‘मॅजिक आकडा’ गाठायचे आव्हान पार करायचे आहे. ‘तुम्ही एव्‍हरेस्टचे शिखर गाठता, तेव्हा तुम्हाला खालीच उतरावे लागते,’ असे विधान भाजपचे प्रदेश सरचिटणीस विनय पाठक यांनी केले. पण त्याचबरोबर ही निवडणूक खूप अटीतटीची होणार असली तरी सत्ता आम्हीच स्थापन करू, असा दावाही त्यांनी केला आहे.

‘सप’साठी आशादायी वातावरण

निवडणूक प्रचारात पहिल्या दिवसापासून योगी आदित्यनाथ पूर्ण ताकदीने उतरले होते. राज्यात यावेळी सत्ताधाऱ्यांविरोधात लाट असली तरी ती भाजपला नाही तर योगींसाठी नुकसानकारक आहे, असाही एक मतप्रवाह येथे आहे. पण जर ही निवडणूक मोदींच्या नावावर विरोधात लढली गेला असती तर भाजपला जास्त संधी होती, असे काही राजकीय तज्ज्ञ सांगतात. निवडणुकीचे पाच टप्पे २७ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण झाले असून २९२ विधानसभा मतदारसंघातील मतदान पूर्ण झाले आहे. राज्यात भाजप सत्ता राखणार की ‘सप’ नवी राजकीय मांडणी करणार, यावर गरमागरम चर्चा सुरू आहे. मतदान फिरविण्याच्यादृष्टीने प्रयत्न म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटी वाराणसीत तीन दिवस तळ ठोकला, यात आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. समाजवादी पक्षाला तळागाळातून वाढता प्रतिसाद मिळत आहे, हे पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासाठी सुखद धक्का आहे. भाजपशी लढणे सोपे नसल्याची जाणीव त्यांना आहे. मात्र निवडणुकीचा एक-एक टप्पा पूर्ण झाला तसे, भाजपला धक्का बसताना दिसत आहे आणि यामुळे पक्षाच्या प्रमुख नेत्यांची अस्वस्थता वाढत आहे. गेल्या काही आठवड्यांतील त्यांच्या बदलत्या पवित्र्यातून पक्षातील वातावरणाची कल्पना येऊ शकते.

नेहमीच्या घोषणांवर लक्ष

उत्तर प्रदेशमधील हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा, हिंदू मतपेढीला आकर्षित करण्यासाठी अयोध्येतील मंदिराची उभारणी, गरीब मतदारांसाठी मोफत धान्य या भाजपचे प्रमुख मुद्दे यंदाही प्रचारात दिसले तसेच कायदा व सुव्यस्था आणि महिला सुरक्षेच्या अर्धसत्य घोषणाही देण्यात आल्या. यापेक्षा पुढे जाऊन अखिलेश यांचे आव्हान मोडून काढण्यासाठी भाजपचे स्टार प्रचारक म्हणून खुद्द पंतप्रधानांनीच धुरा सांभाळली आहे. मोदी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत प्रथमच एकहाती प्रचार मोहीम हाताळली आहे.

फुटीचे राजकारण अयशस्वी

पश्‍चिम उत्तर प्रदेशमध्ये वांशिक फूट पाडण्याचा भाजपची राजनीती गेल्या वर्षभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे अयशस्वी ठरली आहे. एरवी जाट-मुस्लिमांमधील अंतर या आंदोलनाने मिटविले व ते एका छत्राखाली आले आहेत. मध्य ‘यूपी’ आणि अवधमध्ये फुटीचे राजकारण चालले नाही. त्यामुळे भाजपने कायदा व सुरक्षा आणि महिला सुरक्षेचा मुद्दा उचलून धरला. पण या दोन्हीला अखिलेश यादव यांनी अतिशय हुशारीने तोंड दिले. त्याला त्यांची पत्नी व माजी खासदार डिंपल यादव व खासदार जया बच्चन यांचीही साथ मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com