UP Election : ग्रामीण भागांत तिरंगी लढती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UP Assembly Election

UP Election : ग्रामीण भागांत तिरंगी लढती

संत कबीर नगर: गोरखपूरलगतच्या संत कबीर नगर व खलिलाबाद या जिल्ह्यांतील ग्रामीण भागात भाजप, सप, बसप यांमध्ये तिरंगी लढती होत असल्याचे दिसते. काही भागांत आम आदमी पक्षानेही जोर लावला आहे. या भागांत भाजपचा प्रचार तुलनेने कमी दिसत असला, तरी जाणकारांच्या मते भाजपने आपला व्यक्त न होणारा मतदार डोळ्यासमोर ठेऊन घराघरांत जाऊन प्रचाराचे तंत्र अवलंबत त्यांना मतदान करण्यासाठी बाहेर काढण्याचे धोरण आखले आहे.

हेही वाचा: Uttar pradesh : नोएडात इलेक्ट्रॉनिक पार्क

संत कबीर नगर परिसरात रस्त्यांचे जाळे विकसित झालेले दिसत असले, तरी आर्थिक विकासाच्या बाबतीत परिसर मागास दिसतो. संत कबीरांनी या भागात समाधी घेतली असल्याने परिसराचे धार्मिक महत्त्व मोठे आहे. येथील तिरंगी लढतींमुळे नागरिकही कोण निवडून येणार याबद्दल थेट हमरीतुमरीवर आलेले दिसतात. समाजवादी पक्षाचा समर्थक असलेला एक चप्पल व्यावसायिक व बॅंकेत काम करणाऱ्या भाजप समर्थकामध्ये या प्रश्नावर वाद रंगला. ‘भाजपच्या काळात महागाई वाढली असून, जगणे कठिण झाले आहे. एक चप्पलला आधी पाच रुपये मिळत होते व आतही तेवढेच मिळतात. दुसरीकडे तेलापासून पेट्रोलपर्यंत व चपला दुरुस्तीसाठी लागणाऱ्या चुकांपर्यंतच्या सर्वच वस्तू महागल्या आहेत,’ असा त्यांचा दावा होता, तर भाजप समर्थक ३७० कलम हटवल्यापासून राममंदिराच्या निर्माणापर्यंतच्या गोष्टी सांगत होता. यामध्ये एक बसप समर्थक तरूण सामील झाला व त्याने खरा विकास मायवतींनीच केला असा दावा केला. या तिघांमध्ये हा वाद बराच वेळ सुरू राहिला. यातील काही मुस्लिम तरुणांशी संवाद साधला असता, त्यांना मुस्लिम अखिलेश यादव यांनाच साथ देणार असल्याचे सांगितले व त्याचबरोबर तोंडी तलाक रद्द केल्याचे कौतुक फक्त अशिक्षित महिलांना असून, त्यांना धर्मच कळाला नसल्याचे मत नोंदवले. भाजपचे विकासाचे व सामजिक बदलाचे सर्व दावे फोल असल्याचे हे तरुण म्हणाले.

हेही वाचा: Uttar Pradesh BJP | उत्तर प्रदेशमध्ये भाजपला आणखी धक्का ! पाहा व्हिडीओ

खलिलाबाद येथेही असेच चित्र पाहायला मिळाले. या शहरात उड्डाण पूल, मोठे रस्ते व मॉल दिसतात, मात्र युवकांशी बोलताना पुन्हा एकदा बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर येतो. या भागात भाजप व सपबरोबर आपचाही उमेदवार असून, त्याच्या प्रचारासाठी दिल्लीतील आपचे नेते खलिलाबादमध्ये ठाण मांडून बसले असल्याचे दिसते. मंगळवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने आपने रॅली काढली होती. सप उमेदवाराची रॅली दुसऱ्या बाजूने निघाल्याने कोंडीत भर पडत होती. त्या तुलनेत भाजपने छोट्या पदयात्रांवर भर दिलेला दिसला. सर्वच लढती रंगतदार होणार आहेत व ५५ हजार मते मिळवणारा उमदेवार विजयी होणार असल्याने पुढील दोन दिवस पैशांचा खेळ चालेल, त्यामुळे हे दोन दिवस आव्हानात्मक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भाजपच्या प्रचाराचे गूढ

भाजप पूर्वांचलच्या ग्रामीण भागात गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत यंदा खूपच कमी प्रचार करताना दिसत आहे. याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता दोन उत्तरे समोर आली. योगी आदित्यनाथ यांना शहरांच्या ग्रामीण भागात कमी प्रतिसाद असल्याने त्यांना मैदानात उतरवले गेले नसल्याचे एक उत्तर मिळाले, तर पंतप्रधान मोदी व योगी आदित्यनाथ यांनी ठरवून कार्यकर्त्यांना आवाहन करीत थेट लोकांच्या घराच्या दारात डमरू वाजवून प्रवेश करायचा व मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन करण्याचे धोरण आखल्याचे सांगितले गेले. एकंदरीतच, भाजपच्या कमी प्रचारामागचे गुढ काय व ते किती यशस्वी होते हे १० मार्चलाच समजेल.

Web Title: Up Election Triangular Fights Rural Areas

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top