भाजपमध्ये धुमसतोय मराठी अमराठी वाद,  जुने कार्यकर्ते बेदखल; शहर कार्यकारिणीच्या निवडीमध्ये फुटले वादाला तोंड

राम चौधरी
Friday, 3 July 2020

पार्टी विथ डिफरंट अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षात वाशीम जिल्ह्यामध्ये सध्या जुन्या नव्या कार्यकर्त्याबरोबरच मराठी व अमराठी वाद धुमसत असल्याची चर्चा आहे. वाशीम शहर भाजपा कार्यकारिणीच्या निवडीमध्ये अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल्याचा आरोप करीत अनेकांनी नियुक्ती बरोबरच राजीनामे दिले होते

वाशीम ः पार्टी विथ डिफरंट अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षात वाशीम जिल्ह्यामध्ये सध्या जुन्या नव्या कार्यकर्त्याबरोबरच मराठी व अमराठी वाद धुमसत असल्याची चर्चा आहे. वाशीम शहर भाजपा कार्यकारिणीच्या निवडीमध्ये अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल्याचा आरोप करीत अनेकांनी नियुक्ती बरोबरच राजीनामे दिले होते.

या राजीनामा नाट्यानंतर काही नियुक्त्या तर त्या नियुक्त पदाधिकाऱ्यालाच माहित नव्हत्या अशा धक्कादायक घटना समोर आल्या होत्या. भाजपामध्ये मराठी भाषीकांना डावलण्यात येत असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांमधून दबक्या सुरात व्यक्त होत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

जनसंघ ते भाजप या प्रवासामध्ये तत्वनिष्ठ राजकारण करून अनेक बिनीच्या शिलेदारांनी आपली हयात घालविली. ज्या काळात जनसंघाचा कार्यकर्ता हा हेटाळणीचा विषय होता. त्या काळामध्ये तुळशीरामजी जाधव, भाष्करराव रंगभाळ, बबनराव राऊत, डॉ. डबीर, नाना पाठक, सखाराम पाटील चव्हाण, सोपान पाटील ढोबळे, पंजाबराव खांडेकर, ऋषीभाऊ देव या मंडळींनी भाजपाची पताका वाडी वस्त्यावर नेली होती. परिणामी दुसर्‍या पिढीमध्ये हा खडतर प्रवास सत्तेच्या जवळ गेला. यामध्ये आ. लखन मलिक, विजयराव जाधव, सुरेश लुंगे, नरेन्द्र गोलेच्छा, पुरूषोत्तम राजगुरू, प्रा. दिलीप जोशी, मारोतराव लादे या मंडळींनी भाजपला लोकमान्य पक्ष बनविला. मेडशी व वाशीम विधानसभा मतदारसंघ भाजपने ताब्यात घेतल्यानंतर तिसर्‍या पिढीमध्ये गोपाल पाटील राऊत, तानाजी पाटील, मोहन बळी, योगेश देशपांडे, धनंजय हेन्द्रे, शरद पाटील चव्हाण, मोतीभाऊ तुपसांडे, राहुल तुपसांडे, श्याम खोडे, लखनसिंग ठाकूर, विजय काळे, महादेवराव ठाकरे, योगेश सराफ, धनंजय रणखांब, विष्णु खाडे, प्रभाकर पदमणे, पुरूषोत्तम चितलांगे, रवि पाटील राऊत, राजु मानधने, प्रल्हाद गोरे, शिवा भोयर नागेश घोपे यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपाची पताका आपल्या खांद्यावर घेतली आहे. मात्र जे मुळ भाजपाचेच कार्यकर्ते आहेत. त्यांना पाच वर्षापासून काही अपवाद वगळता डावले जात असल्याचा आरोप दबक्या सुरात होत आहे.

भाजपमध्ये सध्या हिंदी भाषिकांचाच बोलबाला असल्याचाही आरोप होत असल्याने शहर भाजपा कार्यकारिणीच्या निवडीमध्ये याची ठिणगी पडली आहे. या कार्यकारिणीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल्याचा आरोप होवून अनेक कार्यकर्त्यांनी नियुक्तीनंतर दुसऱ्याच दिवशी राजीनामे दिले होते. जिल्ह्यामध्ये शहराबरोबरच ग्रामीण भागामध्ये सुध्दा पक्षाचा जनाधार वाढला आहे. यामध्ये पक्षाच्या तिसऱ्या पिढीच्या कार्यकर्त्यांची मेहनत दिसत आहे. परंतु त्यांना प्रतिष्ठेचे पद न देता वरच्या वर्तुळातून हिंदी भाषिकांना पदे वाटल्या जात असल्याचा आरोप होत आहे.

ग्रामीण भागातही जनाधार
जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षामध्ये ग्रामीण भागात जनाधार असणारे अनेक नेते सध्या तरी तोंडावर बोट ठेवून आहेत. जनाधार असणाऱ्या नेत्यांमध्ये राजु पाटील राजे, गोपाल पाटील राऊत, माजी आमदार विजय जाधव, सुरेश लुंगे, आमदार लखन मलिक, बंडू पाटील महाले, विजय काळे इत्यादींचा समावेश आहे. पक्ष संघटनेमध्ये महत्वाची जबाबदारी या नेत्यांना मिळाली तर ग्रामीण भागातही दोन वर्षापूर्वीचा पक्षाचा जनाधार कायम राहू शकतो. मात्र या नेत्यांपैकी अनेकांना सध्या ‘वाट पहा’ या बोलीवर ताटकळत ठेवल्याने ग्रामीण भागातील मराठी माणसासोबत भाजपची नाळ कमजोर होत असल्याचे चित्र आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola washim Marathi Amrathi controversy in BJP, eviction of old workers; Faced with controversy erupted in the election of the city executive