'बर्ड फ्लू'चे सावट, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १० खाटा आरक्षित

केवल जीवनतारे
Tuesday, 12 January 2021

डॉ. अविनाश गावंडे यांच्या पुढाकारातून बर्ड फ्लूसाठी १० खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. सध्या मेडिकलमध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी १००० खाटा आहेत, तर सामान्य रुग्णांसाठी ८०० खाटा आहेत.

नागपूर : बर्ड फ्लूचे सावट पसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बर्ड फ्लू मानवालाही होण्याची शक्यता आहे, हे भाकीत करण्यात आले आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दहा खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुढे आली आहे. 

हेही वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्या पुढाकारातून बर्ड फ्लूसाठी १० खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. सध्या मेडिकलमध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी १००० खाटा आहेत, तर सामान्य रुग्णांसाठी ८०० खाटा आहेत. यासोबतच बर्ड फ्लूचा रुग्ण आढळल्यास त्यांनाही वेगळे ठेवण्यात येणार असून यासाठी १० खाटा आरक्षित केल्या आहेत. या खाटा आरक्षित करण्यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. गावंडे यांनी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याशी चर्चा केली. रुग्ण आढळताच तातडीने तेथे औषधशास्त्र विभागासह इतर डॉक्टरांची नियुक्ती केली जाईल. त्यासाठी या विभागांना दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे. या आजारासह त्यावर उपचाराबाबतही आवश्यक अभ्यास करत उपचाराचीही दिशा निश्चित करून ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.

हेही वाचा - काय म्हणावं याला? मृत बाळांच्या घरी पेटल्या नाही चुली अन् सांत्वनासाठी आलेल्या मंत्र्यांच्या...

मेडिकलमध्ये १० खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. रुग्णांसाठी उपचाराची पूर्ण तयारी करण्यात आली. डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात औषधांसह इतर साहित्य तातडीने उपलब्ध होतील. या रुग्णांवर उपचाराबाबत आवश्यक नियोजनचा आराखडा तयार केला आहे. 
-डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 beds reserved for bird flu in government medical college nagpur