रामेश्वरमवरून आज आकाशात झेपावणार १०० लघू उपग्रह; जागतिक विक्रमाचे सर्वांनाच होता येणार साक्षीदार

मंगेश गोमासे
Sunday, 7 February 2021

विदर्भातील मुलांना त्‍यासंदर्भातील प्रशिक्षण देण्‍यासाठी सेंट विसेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कार्यशाळा घेण्‍यात आली होती. या लघू उपग्रहांचे ७ तारखेला एकाचवेळी प्रक्षेपण केले जाणार आहे. हा जागतिक, आशिया आणि भारतासाठी वि‍क्रम ठरणार आहे.

नागपूर : डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनद्वारे आयोजित ‘स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चैलेंज २०२१’मध्‍ये विद्यार्थ्‍यांनी तयार केलेल्‍या १०० लघू उपग्रहांचे रविवारी, ७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता रामेश्वरम येथून ‘हाय अल्टीट्युड सायन्टिफिक हेलियम बलून’द्वारे प्रक्षेपण केले जाणार आहे. या उपग्रह प्रक्षेपणाचे थेट प्रसारण डॉ. एपीजे अब्‍दुल कलाम फाउंडेशनच्‍या पेजवरून केले जाणार असल्‍यामुळे या जागतिक विक्रमाचे सर्वांनाच साक्षीदार होता येणार आहे.

मिसाईल मॅन ऑफ इंडिया, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना समर्पित स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज २०२१ मध्‍ये 
विदर्भातील १६० विद्यार्थ्यांसह देशभरातून विद्यार्थ्‍यांनी मोठ्या संख्‍येने भाग घेतला होता. सहावी ते बारावीचे विद्यार्थी तसेच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्‍यांनी जगातील सर्वांत कमी वजनाचे (२५ ग्रॅम ते ८० ग्रॅम) १०० उपग्रह तयार केले होते.

अधिक माहितीसाठी - बालविवाह संबंधी सुरू होती जनजागृती; अधिकाऱ्यांच्या कानात माहिती देताच सुरू झाली धावाधाव

विदर्भातील मुलांना त्‍यासंदर्भातील प्रशिक्षण देण्‍यासाठी सेंट विसेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कार्यशाळा घेण्‍यात आली होती. या लघू उपग्रहांचे ७ तारखेला एकाचवेळी प्रक्षेपण केले जाणार आहे. हा जागतिक, आशिया आणि भारतासाठी वि‍क्रम ठरणार आहे.

३८ हजार मीटर उंचीवर सोडणार

विद्यार्थ्यांनी तयार केलेले लघू उपग्रह  ३५,००० ते ३८,००० मीटर उंचीवर हाय अल्टीट्युड सायंटिफिक बलूनद्वारे प्रस्थापित केले जातील. उपग्रह एका केसमध्ये फिट केलेले असतील. या केस सोबत पॅराशूट, जी पी एस ट्रॅकिंग सिस्टिम, लाईव्ह कॅमेरा जोडलेला असेल.

जाणून घ्या - शेतात रोडग्याचे जेवण करायला गेले, घरी पोहोचले अन् सुरू झाली एकच धावपळ

हे उपग्रह अवकाशातील प्रत्यक्ष ओझोन, कार्बनडायॉक्सिड आणि इतर माहिती हे पृथ्वीवरील केंद्राला पाठविण्यात येईल, अशी माहिती डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या महाराष्ट्र  कोअर कमिटीचे सदस्य  आणि  सॉफ्टसेन्स टेक्नो सर्व  इंडिया  प्रायव्हेट  लिमिटेड चे  निर्देशक डॉ. विशाल लिचडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 100 small satellites to be launched from Rameswaram today