धोक्याची घंटा! नागपुरात गेल्या ३ दिवसांतील कोरोना रुग्णांची संख्या बघून बसेल धक्का; आता नियम पाळाच    

केवल जीवनतारे 
Friday, 26 February 2021

कोरोनाने तोंड वर केल्याने प्रशासनाने नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले आहे. शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस बंद केल्याने शंभराने बाधितांच्या संख्येत घट झाली असली तरी आजही एक हजारावर नवे बाधित आढळून आले.

नागपूर ः सलग तिसऱ्या दिवशी हजारावर कोरोनाबाधित आढळून आल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे. शुक्रवारी १०७४ नव्या बाधितांची भर पडली. बुधवारी ११८१, गुरुवारी १११६ बाधित आढळून आले होते. दरम्यान गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत मृत्यूसंख्या घटली. २४ तासांमध्ये ६ कोरोनाबळींची नोंद करण्यात आली असून यात शहरातील दोघांचा समावेश आहे.

कोरोनाने तोंड वर केल्याने प्रशासनाने नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले आहे. शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस बंद केल्याने शंभराने बाधितांच्या संख्येत घट झाली असली तरी आजही एक हजारावर नवे बाधित आढळून आले. शुक्रवारी १०७४ नवे बाधित आढळले असून यात शहरातील ८३७ तर ग्रामीण भागातील २३४ जणांचा समावेश आहे. 

हेही वाचा - 'फेब्रुवारी तो झाकी हैं, एप्रिल-मे बाकी हैं...

जिल्ह्याबाहेरील केवळ तिघे बाधित आढळले. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या १ लाख ४७ हजार ९०५ पर्यंत पोहोचली आहे. बाधितांची संख्या हजारानेच वाढत राहीली तर पुढील दोन दिवसांत बाधितांची एकूण संख्या दीड लाखापर्यंत पोहोचणार आहे. आतापर्यंत शहरातील १ लाख १८ हजार ३८ बाधितांची नोंद करण्यात आली असून ग्रामीण भागातील २८ हजार ९३० बाधित आहेत. जिल्ह्याबाहेरील ९३७ बाधित आहेत. 

दरम्यान गेल्या २४ तासांत केवळ सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे एकूण मृत्यूसंख्या ४ हजार ३२० पर्यंत पोहोचली आहे. यात शहरातील सर्वाधिक २ हजार ७९४ बळी आहेत. दरम्यान, चोविस तासांत १२ हजार ३९६ नागरिकांची चाचणी करण्यात आली. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढत असून बाधितांची संख्याही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन दिवसांत केवळ दरदिवशी दहा हजार चाचण्या करण्यात आल्या होत्या.

सक्रिय रुग्णांत वाढ

मोठ्या प्रमाणात वाढत्या रुग्णांमुळे सक्रिय रुग्णांतही वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यात ७ हजार ४४५ सक्रिय रुग्ण असून शहरात ६ हजार ४०१ शहरात आहेत. आज दोनशे सक्रिय रुग्णांची भर पडली.

हेही वाचा - अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्यांवर नागपूरच्या कंपनीचे नाव, कंपनींच्या...

आठवडाभरात सहा हजार रुग्णांची भर

गेल्या तीन दिवसांत हजारावर रुग्ण आढळून येत आहे. मागील आठवड्यात १९ फेब्रुवारीला एकूण रुग्णांची संख्या १ लाख ४१ हजार ७८२ होती. आज एकूण रुग्णांची संख्या १ लाख ४७ हजार ९०५ पर्यंत पोहोचली. आठवडाभरात सहा हजार १२३ रुग्ण वाढले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1000 plus corona patients today in Nagpur