बहुतांश ग्रामीण भागही असुरक्षित, हिंगणा तालुक्‍यात आढळले 14 "पॉझिटिव्ह'...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जून 2020

आत्तापर्यंत तालुक्‍यात 15 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत 14 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. मुंबई व पुणे शहरातून आलेल्या 70 जणांची आरोग्यतपासणी आज करण्यात येणार आहे.

हिंगणा (जि.नागपूर) : जिल्हयातील बहुतांश तालुक्‍यांना आता कोरोनाची लागण होत असून दिवसेंदिवस बाधीतांची संख्या वाढतच आहे. औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगणा तालुक्‍यातही कोरोनाने विळखा घातला आहे. आत्तापर्यंत तालुक्‍यात 15 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत 14 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. मुंबई व पुणे शहरातून आलेल्या 70 जणांची आरोग्यतपासणी आज करण्यात येणार आहे.

हेही वाचा: धीक्‍कार...धीक्‍कार, हसण्याखेळण्याच्या वयात विद्यार्थिनी झाली माता, कोण तो नराधम?

कोविड सेंटरची निर्मिती
हिंगणा तालुक्‍यात कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. लोकमान्यनगर परिसरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर लोकमान्यनगरात सहा रुग्ण आढळून आले. गुमगावजवळील वागदरा परिसरातही एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. गजानननगर परिसरातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. लोकमान्यनगरातील संपर्कात आलेल्या दहा जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. गजानननगर परिसरातही रुग्णाच्या संपर्कात आलेल्या बारा जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने तालुका प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.

हे नक्‍कीच वाचा : जीवलग दोस्ताने केले दुश्‍मनापेक्षाही भयंकर कृत्य

प्रतिबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची आरोग्यतपासणी
कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात शासकीय कर्मचारी कार्यरत आहेत. अहोरात्र कर्मचारी अविरत सेवा देत आहेत. यात आरोग्य, पोलिस, महसूल, ग्रामपंचायत, आशासेविका अंगणवाडीसेविका यासह इतर विभागांतील कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने काय उपाययोजना केली, अशी जनहित याचिका न्यायालयात दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रथमच हिंगणा तालुक्‍याने पुढाकार घेत प्रतिबंधित क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची आरोग्यतपासणी केली. उर्वरित सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांची आरोग्यतपासणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14 "Positive" found in Hingana taluka ...