दिवाळीत तब्बल २३ लाखांचे साहित्य जळून खाक; नागपुरात दोन दिवसांत आगीच्या १६ घटना

राजेश प्रायकर 
Saturday, 21 November 2020

दिवाळीच्या दिवशी रात्रीपासून सकाळपर्यंत शहराच्या जगनाडे चौक, सेंट्रल एव्हेन्यू, सावित्रीबाई फुलेनगर, हंसापुरी, पन्नासे ले-आऊट, कोराडी रोड, कमाल चौकातील दुकाने तसेच घराच्या परिसरातही आग लागली.

नागपूर ः दिवाळीत फटाक्यांमुळे आगीच्या घटना नित्याचीच बाब झाली. दिवाळी तसेच दुसऱ्या दिवशी यंदाही शहरातील विविध भागातील दुकाने, घरांमध्ये आग लागली. विविध ठिकाणी लागलेल्या आगीत एकूण २३ लाखांचे साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवित सात कोटींच्या मालमत्तेची बचत केली.

दिवाळीच्या दिवशी रात्रीपासून सकाळपर्यंत शहराच्या जगनाडे चौक, सेंट्रल एव्हेन्यू, सावित्रीबाई फुलेनगर, हंसापुरी, पन्नासे ले-आऊट, कोराडी रोड, कमाल चौकातील दुकाने तसेच घराच्या परिसरातही आग लागली. जगनाडे चौकातील घरामध्ये लागलेल्या आगीत एसी, कपाट, त्यातील कपडे असे ५० हजारांचे घरगुती साहित्य जळाले. दिघोरी येथील कीर्तीनगरातील निरज आवळे यांच्या घरात फटाक्यांमुळे आग लागली. त्यांचे दहा हजारांचे नुकसान झाले. 

सविस्तर वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

मानेवाडा रोडवरील सावित्रीबाई फुलेनगरातही फटाक्यामुळे एका घरात आग लागली. गणेश टेकडी मंदिर रोडवरील कचऱ्याला आग लागली. हंसापुरीतील नालसाब रोडवरील एका घराच्या छतावर फटाक्यामुळे आग लागली. पन्नासे ले-आऊट येथील एका घरात आग लागली. परंतु आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविण्यात आले.

कोराडी रोडवरील सुंदर बिस्किट कंपनीत बिस्किट तयार करण्यासाठी आणलेल्या साहित्य जळाले. यात साखरेचे ५० किलोचे ४० पोते, मैदाचे ३० पोते जळून खाक झाले. यात नऊ लाखांचे नुकसान झाले. सेंट्रल एव्हेन्यू, गांधीबाग येथील जेसी लाईटिंग या दुकानात आग लागल्याने सर्वाधिक दहा लाखांचे नुकसान झाले. 

कमाल चौकातील अशोकनगरातील निशांत गंगनानी यांच्या घरात दिव्यामुळे आग लागून कपडे व पूजेचे साहित्य जळाले. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीही आगीच्या घटना कायम होत्या. शांतीनगर रेल्वे क्रॉसिंगजवळील घरात सिलिंडर गॅस गळतीमुळे आग लागली. सतरंजीपुरा येथे सुनील हॉटेलमागील एका सुपारीच्या गोदामाला आग लागली. 

जाणून घ्या -थरारक घटनाक्रम : मध्यरात्री घरात शिरले दरोडेखोर; बापलेकावर हल्ला केल्यानंतर शस्‍त्र टाकून काढला पळ

कामठी रोडवरील कडबी चौकातील एका आरामशीनला लागलेल्या आगीत ७० हजारांचे नुकसान झाले. हुडकेश्वर रोडवरील आशीर्वादनगरातील घरात फटाक्यामुळे आग लागली. यात सोफासेट, गादी, खुर्च्या आदी ४० हजारांचे साहित्य जळाले. कामठीत ड्रॅगन पॅलेसजवळील घरात आग लागली. यात सोफा, टीव्ही, फ्रीज, ॲक्वागार्ड, एसी, मोबाईल आदी २ लाखांचे साहित्य जळाले. गणेशपेठ येथील राहूल कॉम्प्लेक्सला फटाक्यामुळे कचऱ्याला आग लागली.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 fire incidents happen in only 2 days in nagpur while diwali