१६ खाजगी रुग्णालयांची लबाडी उघड; रुग्णांना रक्कम परत करण्याचे आयुक्तांचे निर्देश

राजेश प्रायकर 
Thursday, 15 October 2020

कोव्हिड रुग्णांवर उपचार करताना खासगी कोव्हिड हॉस्पिटलसाठी शासनाने दर निश्चित केले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार खाजगी रुग्णालये शुल्क आकारत आहेत की नाही, हे तपासण्यासाठी महापालिकेने पूर्व अंकेक्षक नेमले आहेत. या अंकेक्षकांकडून बिलाचे अंकेक्षण करण्यात येते. 

नागपूर :  शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक पैसे वसूल करणाऱ्या खाजगी रुग्णालयांची अखेर महापालिकेच्या ऑडिटरने केलेल्या अंकेक्षणातून लबाडी उघड झाली. कोरोना रुग्णांकडून अतिरिक्त पैसे उकळणाऱ्या १६ खाजगी रुग्णालयांना नोटीस देत महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पैसे परत करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे अनेक गरीब रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

कोव्हिड रुग्णांवर उपचार करताना खासगी कोव्हिड हॉस्पिटलसाठी शासनाने दर निश्चित केले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार खाजगी रुग्णालये शुल्क आकारत आहेत की नाही, हे तपासण्यासाठी महापालिकेने पूर्व अंकेक्षक नेमले आहेत. या अंकेक्षकांकडून बिलाचे अंकेक्षण करण्यात येते. 

सविस्तर वाचा - मुलांनी आईला प्रश्न विचारताच सर्वच झाले शांत; काही सेकंदात आजी-आजोबांनी फोडला हंबरडा

दरम्यान, खाजगी रुग्णालये लूट करीत असल्याच्या अनेक तक्रारी आयुक्तांकडे आल्या होत्या. त्यानुसार १६ हॉस्पिटलच्या बिलाचे अंकेक्षण करण्यात आले. यात शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दराने शुल्क आकारणी केल्याची बाब उघडकीस आली. काही रुग्णालयांनी पीपीई किटचे दर शासन दरापेक्षा अधिक आकारले. 

काही रुग्णालयांनी बेडचे दर फिजीशीयन व्हीजीट दर अधिक वसूल केले, असे निदर्शनास आलेय मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेतली. तातडीने या रुग्णालयांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.

अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी सर्व १६ हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना नोटीस बजावून रुग्णांकडून अतिरिक्त वसूल केलेली रक्कम तातडीने रुग्णांना परत करण्याचे निर्देश दिले आहेत. या कार्यवाहीमुळे खासगी हॉस्पिटल्सना दणका बसला असून रुग्णांना मात्र दिलासा मिळाला आहे.

ठळक बातमी - मुलाला असलेले मोबाईलचे वेड बेतले वडिलांच्या जीवावर; कुटुंबातील कर्त्या पुरुषाने उचलले टोकाच पाऊल

लूट करणारे हॉस्पिटल

रुग्णांकडून वसूल केलेली अतिरिक्त रक्कम परत करण्याचे निर्देश देण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये छत्रपती चौकातील न्यूक्लिअस मदर ॲण्ड चाईल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, रविनगरातील सेनगुप्ता हॉस्पिटल, ओरियस इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस, ग्रेस ऑर्थो हॉस्पिटल, कोराडी रोडवरील मेडिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, रामदासपेठेतील सुश्रुत इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस, सेंट्रल हॉस्पिटल, गंगा केअर हॉस्पिटल, समर्पण हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इंस्टिट्यूट, बजाजनगारतील सिम्स हॉस्पिटल, पारडीतील एव्हर शाईन हॉस्पिटल, श्री भवानी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इंस्टिट्यूट ट्रस्ट, ग्रेट'नाग रोडवरील सेव्हन स्टार हॉस्पिटलसह सनफ्लॉवर हॉस्पिटल, विवेका हॉस्पिटल, झेनिथ हॉस्पिटल यांचा समावेश आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 private hospital fraud are exposed in nagpur