संवाद, अभिनय टाळ्या आणि उत्साहच उत्साह

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

मंगळवारी सहा बालनाट्यांच्या सादरीकरणाने रंगभूमी गाजली. सकाळच्या सत्राचा प्रारंभ मुंडले इंग्लिश मिडियम स्कूलचे स्वप्निल बोहटे लिखित व मेघा पाध्ये दिग्दर्शित "कृष्णनीती' हे बालनाट्य सादर झाले.

नागपूर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 17 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेला सोमवारी सुरुवात झाली. नाजुक आवाजातील संवाद, इवल्याशा पावलांचा रंगमंचावरील वावर अन्‌ बच्चे प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात सादर होणारा बालकलावंतांचा दर्जेदार अभिनय प्राथमिक फेरीची रंगत अधिकच बहरदार करीत होता.

सविस्तर वाचा - उपद्रव शोधपथकाचे ओ$$$$ काट

मंगळवारी सहा बालनाट्यांच्या सादरीकरणाने रंगभूमी गाजली. सकाळच्या सत्राचा प्रारंभ मुंडले इंग्लिश मिडियम स्कूलचे स्वप्निल बोहटे लिखित व मेघा पाध्ये दिग्दर्शित "कृष्णनीती' हे बालनाट्य सादर झाले. निर्मिती साहाय्य सारंग मास्टे यांचे होते. तर स्कूल ऑफ स्कॉलर्सचे गौरव खोंड लिखित व ओमेश लांजेवार दिग्दर्शित "अंत:र्मुख : शोध स्वत:चा' हे बालनाट्य व श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळेचे धनंजय सरदेशपांडे लिखित व उत्कर्षा महाजन दिग्दर्शित "गांधी व्हायचंय आम्हाला' बालनाट्याने सत्राचा समारोप झाला. दुपारचे सत्राची सुरुवात "आणि सदाफुली रंगीत झाली' या साउथ इंडियन एज्युकेशनल सोसायटीच्या बालनाटकाने झाली. त्यानंतर "म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे' हे सरस्वती विद्यालयाचे धनंजय सरदेशपांडे लिखित व कीर्ती वरणकर दिग्दर्शित बालनाट्य सादर झाले. सहयोगी कलावंत सांस्कृतिक शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे गौरव भोयर लिखित व दिग्दर्शित "गचक अंधारी' बालनाट्याने दुसऱ्या दिवसाचा समारोप झाला.

बालरंगभूमी परिषदेची पाठ?
बालनाट्याची चळवळ उभारणाऱ्या बालरंगभूमी परिषदेने 17 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेकडे पाठ फिरवली असल्याची सभागृहात चर्चा होती. स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्याला बालरंगभूमीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देऊनही अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने मोठे आश्‍चर्य व्यक्‍त होत होते. बालरंगभूमीवर 21 नाटकांचे सादरीकरण होते आहे ही मोठी गोष्ट असूनही, स्पर्धा केंद्राकडे वळूनही बघायचे नाही, हे योग्य नसल्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये होती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 17th state children theater compitition held in Nagpur