गोड बातमी आली, नागपुरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दोनशे बाळांचा जन्म

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जानेवारी 2020

शहरात एकूण 640 पेक्षा अधिक खासगी रुग्णालये आहेत. यांतील पन्नास टक्‍क्‍यांहून जास्त नर्सिंग होम आहेत. या खासगी नर्सिंग होममध्ये 70 ते 80 बालकांचा जन्म दर दिवसाला होतो. दरवर्षी उपराजधानीत 59 ते 60 हजार बाळं जन्माला येतात. म्हणजेच दर दिवशी 230 बाळांचा जन्म होतो.

नागपूर ः जन्माची वेळ कुणाचीच निश्‍चित नसते. डॉक्‍टर व्यक्‍त करतात ते केवळ अंदाज. अशावेळी एखादा महत्त्वाचा मुहूर्त अचानक साधला गेला तर अशांच्या जन्माची सारेच नोंद घेतात, असे भाग्य फारच थोड्यांना लाभते. उपराजधानीत यंदा असे भाग्य तब्बल 40 बालकांना लाभले.सारे जग नववर्षाचा जल्लोष साजरा करीत असतानाच्या पहिल्या तासात ही बालके जन्माला आली.
नववर्षाच्या पहिल्या दिवशीच नवा पाहुणा घरी आला. मुलगी असो वा मुलगा, बाळाच्या जन्माचा आनंद मोठा आहे. दरवर्षी नववर्षाला बाळाच्या जन्माचा आनंद आम्ही साजरा करू, अशी भावना 1 जानेवारीला जन्माला आलेल्या बाळांच्या मातापित्यांनी व्यक्त केली.

 सविस्तर वाचा - राज्यातील सतरा टायगर अभि जिंदा नही है

उपराजधानीत 1 जानेवारी 2020 रोजी डागा, मेयो आणि मेडिकलसह खासगी रुग्णालयांत पहिल्या तासात 40 ते 45 बालके जन्माला आली. यावरून 24 तासांमध्ये सुमारे दोनशेवर बालके जन्माला आली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
मेयो रुग्णालयात 12 वाजून 5 मिनिटांनी दीपाली तुमडाम यांनी मुलीला जन्म दिला. सहा तासांत मेयोत 8 बाळांचा जन्म झाला. यात मुलींचा टक्का अधिक होता. डागा रुग्णालयात हीच स्थिती होती. मध्यरात्रीनंतर 12 वाजून 40 मिनिटांनी बाळ जन्माला आले. मेडिकलमध्ये मध्यरात्री 12 वाजून 20 मिनिटांनी बाळ जन्माला आले. मेडिकलमध्ये 12 तासांत 31 प्रसूती झाल्या. नववर्षाच्या पहिल्या दिवशी पहिल्या बारा तासांत सर्वाधिक 23 प्रसूती डागा रुग्णालयात झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर यांनी दिली. बुधवार हा मुलींच्या जन्माचा दिवस होता.
शहरात एकूण 640 पेक्षा अधिक खासगी रुग्णालये आहेत. यांतील पन्नास टक्‍क्‍यांहून जास्त नर्सिंग होम आहेत. या खासगी नर्सिंग होममध्ये 70 ते 80 बालकांचा जन्म दर दिवसाला होतो. दरवर्षी उपराजधानीत 59 ते 60 हजार बाळं जन्माला येतात. म्हणजेच दर दिवशी 230 बाळांचा जन्म होतो.

 

मुलींच्या जन्माचा टक्का वाढला

नागपुरात मेयो, मेडिकल आणि डागा रुग्णालयात पहिल्या बारा तासांत 66 अपत्ये जन्माला आली. मेयो-मेडिकल आणि डागातील बाळांच्या जन्माच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास शहरात 38 मुली जन्माला आल्या. पहिल्या बारा तासांत मुलींच्या जन्माचा टक्का वाढला आहे. हीच टक्केवारी वर्षाअखेरपर्यंत कायम राहिल्यास यावर्षी मुलींच्या जन्माचा टक्का वाढेल.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 200 births recorded on 1st jan in Nagpur