विधान परिषद निवडणूकीसाठी कॉंग्रेसमध्ये २५० वर इच्छुक, नेते दाखवताहेत श्रेष्ठींकडे बोट !

250 plus people from congress are interested for vidhan parishad election
250 plus people from congress are interested for vidhan parishad election

नागपूर ः राज्यपाल कोट्यातील विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या १२ जागांसाठी सदस्यांची निवड होऊ घातली आहे. महाविकास आघाडीतील तिनही पक्षांनी प्रत्येकी चार जागांवर आपले उमेदवार देण्याचे नियोजन केल्याची माहिती आहे. पण यामध्ये विदर्भातून कुणाला संधी मिळेल, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही.

कॉंग्रेसमध्ये चार पैकी एकच जागा विदर्भाच्या वाट्याला येण्याची शक्यता असल्याचे एका नेत्याने सांगितले, तर २५० पेक्षा जास्त जणांनी इच्छा व्यक्त केली. या निवडीसाठी विदर्भातील नेते श्रेष्ठींकडेच बोट दाखवत आहेत. त्यामुळे दिल्ली दरबारी ज्याचे वजन जास्त असेल, त्या एकाचा नंबर विधान परिषदेवर लागेल, असे चित्र आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार जवळपास निश्‍चित झाल्यासारखेच आहेत. त्यात विदर्भातून सध्यातरी कुणीही नाही. नुकताच कार्यकाळ संपलेले प्रकाश गजभिये यांना पुन्हा संधी मिळते की नाही, याबाबतही कुणी ठोस सांगत नाही आणि शिवसेनेचा कल मुंबई आणि कोकणकडेच नेहमी राहीला आहे. राज्यपाल कोट्यातून आजपर्यंत विदर्भातील कुणालाही संधी दिली गेली नाही. त्यामुळे झालाच तर अख्या विदर्भातून कुणीही एकच विधान परिषदेवर जाऊ शकतो, असे आजच्या एकंदर स्थितीवरून दिसतेय.

अशोक चव्हाण कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा त्यांचा विदर्भाशी चांगला संपर्क होता. आज ते प्रदेशाध्यक्ष असते तर विदर्भातून ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आणि अनंत घारड यांच्यासारखी नावे विधानपरिषदेसाठी किमान चर्चेत तरी असती. पण विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे म्हणावे तसे विदर्भात कुणीही खास नाही. 

प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून फक्त एकच वेळा ते नागपुरला आले आहेत. त्यामुळे या निवडीमध्ये कॉंग्रेसकडून विदर्भाचा फार विचार होईल, असे वाटत नाही. गेल्या निवडणुकीत विदर्भाने कॉंग्रेसला चांगली साथ दिली आहे. त्यामुळे विदर्भातील एका नेत्याने सांगितल्यानुसार विधान परिषदेत एक सदस्य कॉंग्रेसचा असू शकेल. यवतमाळ जिल्ह्यातील कॉंग्रेसचे एक ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आज नाही म्हणत आहेत, पण ते इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे. दुसरे नाव भाजपचे माजी आमदार आणि सद्यस्थितीत कॉंग्रेसवासी झालेले युवा नेते यांचे असू शकते, असेही सूत्र सांगतात.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विदर्भाला प्रतिनिधीत्व देण्याची शक्यता कमीच दिसत असली तरीही ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल काय विचार करतात, यावरही बरेच काही अवलंबून आहे. अकोला जिल्ह्यातील वंचित बहुजन विकास आघाडीचे अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम शिरस्कर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या दोघांनाही विधान परिषदेवर वर्णी लागेल, अशी आशा आहे. पण दोघांपैकी एकाला महामंडळ, तर दुसऱ्याला पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com