अतिरिक्त शुल्क आकारणे भोवले, सांदिपनी शाळेवर ३ कोटींची वसुली

मंगेश गोमासे
Thursday, 21 January 2021

पालकांकडून शिक्षण शुल्काच्या नावावर मोठ्या प्रमाणात वसुली करण्यात येते. कोरोनाच्या काळातही पालकांकडून शाळांद्वारे शुल्काची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी पालकांकडून शिक्षण विभागाकडे देण्यात आल्यात.

नागपूर : पालकांकडून अतिरिक्त शुल्क वसुलीप्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीचा आधार घेत, शिक्षण विभागाने शैक्षणिक संस्थांवर कारवाईस सुरुवात केली आहे. त्यानुसार यापूर्वी नारायणा विद्यालयावर ७ कोटींपेक्षा अधिक शुल्काची वसुली करण्याचे आदेश दिले होते. आता सांदिपनी शाळेवर ३ कोटी ४७ लाख ३६ हजाराची वसुली करण्याचा अहवाल उपसंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. 

हेही वाचा - मन सुन्न करणारी घटना! 'डिअर मॉम...आय लव्ह यू' लिहून सोडला जीव, आईनं फोडला एकच हंबरडा

पालकांकडून शिक्षण शुल्काच्या नावावर मोठ्या प्रमाणात वसुली करण्यात येते. कोरोनाच्या काळातही पालकांकडून शाळांद्वारे शुल्काची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी पालकांकडून शिक्षण विभागाकडे देण्यात आल्यात. त्यावरुन शिक्षण विभागाने या तक्रारीचा आधार घेत, चौकशी समितीद्वारे शाळांकडून वसूल करण्यात येणाऱ्या शुल्काची तपासणी करण्यास सुरुवात केली. यातूनच नारायणा विद्यालयावर ७ कोटींपेक्षा अधिक शुल्काची वसुली करण्याचे आदेश दिले होते. आता शहरातील नामवंत शाळा असलेल्या सांदिपनी शाळेबाबत आलेल्या तक्रारीचा आधार घेत, प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी शाळेच्या शुल्काची तपासणी करून शाळेवर ३ कोटी ४७ लाख ३६ हजाराची वसुली काढली आहे. ही वसुली २०१७-१८ ते २०१९-२० या कालावधीतील आहे. यासाठी समितीच्या माध्यमातून ऑडिट रिपोर्ट तपासण्यात आले होते. विशेष म्हणजे हा अहवाल उपसंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार टप्प्याटप्याने शुल्काची वसुली केली जाणार असल्याचे समजते. दरम्यान, याबाबत विभागाकडून मौन बाळगण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 crore will recovered from sandipani school in nagpur