नागपुरात हे चाललंय काय? गेल्या १० दिवसांत मांजानं घेतला तिसरा बळी; राष्ट्रवादी कॉंग्रेस उतरली रस्त्यावर 

टीम ई सकाळ 
Tuesday, 12 January 2021

नागपुरात अनेक वर्षांपासून नायलॉन मांजाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे कार्यक्रम घेण्यात येतात. मागील संक्रांतीच्या काळात नायलॉनचा मांजा वापरू नये, यासाठी जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे काही प्रमाणात या मांजाच्या वापराला आळा बसला.

नागपूर ः संक्रांत एका दिवसावर आली आहे. अशात रंगीबेरंगी पतंगांनी आकाश गजबजू लागले आहे. पण आज शहरात नायलॉन मांजाने प्रणय ठाकरे या युवकाचा जीव घेतला. हा जीवघेणा मांजा लोकांनी वापरू नये, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर प्रवक्ते श्रीकांत शिवणकर यांनी रस्त्यावर उतरून जनजागृती केली. येवढेच नव्हे तर नियम तोडून नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर आणि वापरणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. 

अधिक माहितीसाठी - हृदयद्रावक! उडलीच नाही त्या तरुणाच्या स्वप्नांची पतंग; दुचाकीवरून जाताना घडली मन सुन्न करणारी घटना 

नागपुरात अनेक वर्षांपासून नायलॉन मांजाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे कार्यक्रम घेण्यात येतात. मागील संक्रांतीच्या काळात नायलॉनचा मांजा वापरू नये, यासाठी जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे काही प्रमाणात या मांजाच्या वापराला आळा बसला. पक्षी व लोकांच्या जिवावर बेतण्यास कारण ठरलेला नायलॉन धागा पतंगांसाठी वापरण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी आणली असली तरी त्याची छुप्या पद्धतीने सर्रास विक्री होत आहे. 

गेल्या १० दिवसांत नायलॉन मांजाने घेतलेला प्रणय हा तिसरा बळी आहे. यापूर्वी वंश तिरपुडे आणि एंटा सोळंकी या दोन मुलांना नायलॉन मांजामुळे जीव गमावला आहे. नायलॉन मांजामुळे संक्रांतीच्या काळात पशुपक्ष्यांना हमखास इजा होते. हा मांजा रस्त्यात, झाडावर किंवा इतरत्र अडकल्याने नागरिकांच्या जिवालाही घातक ठरतो. त्यामुळे अनेक नागरिकांना, तसेच पक्ष्यांनाही गंभीर इजा झाल्या आहेत. या मांजामुळे अनेकांना जीवदेखील गमवावा लागला आहे. नायलॉन मांजाच्या वापरामुळे मागील वर्षी शंभरच्या वर नागरिक जखमी झाले होते. मात्र, तरीही यातून बोध घेतला जात नसून या मांजाची छुप्या पद्धतीने विक्री होत आहे. 

नक्की वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

पक्ष्यांचा, जनावरांचा आणि माणसांच्या जिवास धोका निर्माण होत आहे आणि म्हणून या बाबतीत कठोर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे. या संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवध भादंवी कलम ३०४, ३३६, ३३७, ३३८ या प्रमाणे कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे. यासंदर्भात जनजागृती अभियानाची आज सक्करदरा चौकातून राबवण्यात आले. जनजागृती रॅलीत पतंग दुकानदारांना आणि रस्त्यावरील नागरिकांना नायलॉन मांजामुळे होणारे नुकसान आणि ते न विकण्यासाठी प्रबोधन करण्यात आले. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 kids are no more due to manja in 10 days in Nagpur Latest News