आज नागपुर शहरात कोरोनाचा एकच मृत्यू; ग्रामीण ३ तर जिल्ह्याबाहेरचे ५ मृत्यू 

केवल जीवनतारे 
Tuesday, 3 November 2020

बाधितांची संख्या १ लाख ३ हजार ६४२ वर पोहचली. मात्र, घरीच उपचार घेत असलेल्या विलगीकरणातील रुग्णांची संख्या २३३० वर आली. कोरोनामुक्तीचा टक्का ९३.११ वर पोहचला.

नागपूर ः कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असतानाच अचानक नोव्हेंबरमध्ये पुन्हा बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले. मात्र, मंगळवारी (ता.३) कोरोनाच्या बाधेने नागपूर शहरातील केवळ एकाचा मृत्यू झाला. तर ग्रामीण भागातील ३ जणांसह जिल्ह्याबाहेरील ५ असे ९ मृत्यू झाले. नव्याने ३८५ बाधित आढळले. यामुळे बाधितांची संख्या १ लाख ३ हजार ६४२ वर पोहचली. मात्र, घरीच उपचार घेत असलेल्या विलगीकरणातील रुग्णांची संख्या २३३० वर आली. कोरोनामुक्तीचा टक्का ९३.११ वर पोहचला.

११ मार्च रोजी नागपुरात पहिल्यांदा कोरोनाचा रुग्ण आढळला होता. यानंतर एप्रिलमध्ये एक जण दगावला. एप्रिलमधील स्थिती आजघडाली आली असल्याचे दिसून आले. शहरात केवळ एकच मृत्यू झाल्याने जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला. आतापर्यंत मृत्यूचा आकडा ३ हजार ४२९ झाला आहे. यातील २ हजार ४२८ जण शहरातील तर ग्रामीण भागात आतापर्यंत ५७५ मृत्यू झाले. 

सविस्तर वाचा - विवाहितेची कमाल! जिवंत पतीला मृत दाखवून लाटले शासकीय अनुदान अन् केले दुसरे लग्न

नागपूर जिल्ह्याबाहेरून मेडिकल मेयोसह खासगीत रेफर करण्यात आलेल्या ४२६जणांचा नागपुरात मृत्यू झाला. यामुळे मृत्यूचा टक्का जिल्ह्यात वाढल्याचे दिसून येते. जिल्ह्यात मंगळवारी ५ हजार ४६८ कोरोनाच्या चाचण्या झाल्या. यातील ३८५ जणांना बाधा झाल्याचे आढळले. यात सर्वाधिक २०४ जण खासगी प्रयोगशाळेतून बाधित असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. 

एम्समध्ये १६, मेडिकलमध्ये ३२ तर मेयोत ५८ जण बाधित असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले. २२६४ रॅपिड ॲन्टीजन चाचणीतून अवघे ३२ जण बाधित आढळून आले. १ आणि २ नोव्हेंबरच्या तुलनेत ३ नोव्हेंबरला बाधितांची संख्या वाढली. तरी नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने व्यक्त केले. आतापर्यंत ६ लाख ४५ हजार ४४१ कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. यातील १ लाख ३ हजार ६४२ जण कोरोनाबाधित झाले असून यातील ८२ हजार ०७५ कोरोनाबाधित शहरातील तर २० हजार ९५९ जण ग्रामीण भागातील कोरोनाबाधित आहेत.

एक हजारपेक्षा कमी रुग्ण

सध्या शहरात २ हजार ६६७ रुग्ण, ग्रामीणला १ हजार ३७ रुग्ण असे एकूण ३ हजार ७०४ सक्रीय बाधित आहेत. त्यातील रुग्णालयांत उपचार घेणाऱ्यांची संख्या ९८९ आहे. तर गृह विलगीकरणात २ हजार ३३० बाधितांवर उपचार सुरू असून, ३८५ नवीन बाधितांवर संध्याकाळी सहा वाजतापर्यंत उपचाराची प्रक्रिया सुरू होती. 

अधिक माहितीसाठी - खासदार बाळू धानोरकरांचा इतिहास काँग्रेसमध्ये सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल 

दरम्यान ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये शहरात अत्यवस्थ बाधितांना एकीकडे रुग्णालयांत खाटा मिळत नसतांना आता सर्वच रुग्णालयांत अनेक खाटा रिकाम्या असल्याचे चित्र आहे. महिनाभरापुर्वी गृह विलगीकरणात सुमारे ९ हजार कोरोनाबाधित होते. आता २३३० आहेत. मंगळवारी ४०१ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे ९६ हजार ५०९ जणांना आतापर्यंत कोरोनामुक्त घोषित करण्यात आले. यापैकी ७६ हजार ९८० जण हे शहरातून तर १९ हजार ५२९ जणांना ग्रामीण भागातील कोरोना मुक्त झाले आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 385 new corona positive patients in nagpur today