मी बॅंक अधिकारी आहे, तुमच्या मुलीसोबत लग्न करीन... 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

चैतन्यने पानठेला चालकाला त्याच्या मोठ्या मुलीशी लग्न करायचे असल्याचे सांगितले. सध्या शिक्षण सुरू असल्याने तीन वर्षांनंतर लग्नाचा विचार करू, असे चैतन्यला म्हणाला. तीन वर्षांनंतर मी तुमच्याच मुलीशी लग्न करेन, अशी चैतन्यने बतावणी केली अन्‌... 

नागपूर : मुलीशी लग्न करण्याच्या बहाण्याने बॅंकेच्या तोतया अधिकाऱ्याने साथीदारांच्या मदतीने पानठेलाचालकाला तब्बल 41 लाख 50 हजार रुपयांनी गंडा घातला. पानठेला चालकाच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी सूत्रधार व तोतया अधिकारी चैतन्य प्रीतम मौंदेकर (रा. गांजाखेत), नेहा खोब्रागडे व अशफाक भाई या तिघांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

तहसील भागात राहणारा 50 वर्षीय पानठेला चालकाला दोन मुली व मुलगा आहे. एप्रिल 2016 मध्ये चैतन्य याची पानठेलाचालकाच्या मुलीसोबत ओळख झाली. त्यानंतर चैतन्यने पानठेला चालकाच्या घरी जायला सुरुवात केली. सीबीआयचा अधिकारी असल्याचे त्याने पानठेला चालकाला सांगितले होते. दरम्यान, त्याने पानठेला चालकाला नेहाची ओळख करून दिली. ती मावशीची मुलगी असल्याचे सांगितले.

असे का घडले? - नऊ वर्षांचा चिमुकला कानात सोन्याची बारी घालून शाळेत गेला अन्‌...

चैतन्यने पानठेला चालकाला त्याच्या मोठ्या मुलीशी लग्न करायचे असल्याचे सांगितले. सध्या शिक्षण सुरू असल्याने तीन वर्षांनंतर लग्नाचा विचार करू, असे चैतन्यला म्हणाला. तीन वर्षांनंतर मी तुमच्याच मुलीशी लग्न करेन, अशी चैतन्यने बतावणी केली. माझे वडील आयकर विभागात असून, त्यांना वाठोडा भागात दोन प्लॉट बक्षीस मिळाल्याचे चैतन्यने पानठेला चालकाला सांगितले. प्लॉट बक्षीसमध्ये मिळाले असल्याने त्याची रजिस्ट्री आपल्या नावे होऊ शकत नाही. त्यामुळे एक प्लॉट तुमच्या (पानठेलाचालकाच्या) नावे करून देतो. त्यासाठी दहा लाख खर्च येईल, असे चैतन्य त्याला म्हणाला. पानठेला चालक त्याच्या आमिषाला बळी पडला. 

पानठेला चालकाने प्लॉट विकून चैतन्यला दहा लाख दिले. पैसे मिळताच रजिस्ट्री बंद झाल्याचा बहाणा करीत ही रक्कम एफडी केल्याचे चैतन्यने पानठेला चालकाला सांगितले. पानठेला चालकाचा त्याच्यावर विश्‍वास बसला. त्यानंतर रेल्वेचे बडे अधिकारी ओळखीचे असल्याचे सांगून चैतन्यने पानठेला चालकाला रेल्वेत टीसीची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. अशफाक याला रेल्वेचा अधिकारी असल्याचे सांगून पानठेला चालकासोबत ओळख करून दिली. याचप्रकारे वेळोवेळी आमिष दाखवून त्याने पानठेला चालकाकडून 41 लाख 50 हजार रुपये उकळले.

जाणून घ्या - ठेक्‍याने घेतलेल्या शेताच्या पैशांचा झाला डोंगर... मग उचचले हे पाऊल

4.50 लाखांची चोरी

कृपलानी रुग्णालयामागे, तहसील निवासी राजकुमार गिरधारीलाल मुलचंदानी (60) यांचे तीन नल चौक, कसारपुरा येथे भागचंद तोलाराम नावाने चप्पल-जोड्यांचे शोरूम आहे. सात जानेवारीला रात्री नऊ वाजता ते दुकान बंद करून घरी गेले. मध्यरात्रीला चोरांनी शोरूमच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. गल्ल्यातील रोख 4.50 लाख रुपयांवर हातसाफ करून पसार झाले. यानंतर आरोपींनी आपला मोर्चा शेजारी असलेल्या लक्ष्मी मेगा मार्ट नावाच्या दुकानाकडे वळवला. या दुकानाचे कुलूप ही तुटलेले होते, मात्र येथून चोरांच्या हाती काही लागले नाही. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 42 lakh fraud in Nagpur