धनत्रयोदशीला तब्बल ५० हजार तोळे सोन्याची विक्री; चांदीच्या विक्रीने गाठला विक्रमी आकडा 

राजेश रामपूरकर 
Saturday, 14 November 2020

धनत्रयोदशीनिमित्त सोन्याच्‍या दुकानांमध्ये किरकोळ ग्राहकांनी गर्दी केली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उन्हाळातील लग्नसमारंभ थांबले होते. तसेत गुढीपाडवा आणि अक्षयतृतीयेलाही सोने खरेदीवर विरजण पडले होते

नागपूर ः दसऱ्याचा मुहूर्त साधल्यानंतर धनत्रयोदशीच्या पूर्वीच सोने खरेदी करणाऱ्यांना एक गोड बातमी मिळाली. सोन्याच्या दरात अचानक प्रति दहा ग्रॅममागे एक हजार रुपयांची घसरण झाल्याने नागरिकांनी सोन्याच्या खरेदीसाठी दिवाळीचा मुहूर्त साधला. धनत्रयोदशीला घाऊक आणि किरकोळ बाजारात उलाढाल जोमात राहिली. त्यामुळे शहरात अंदाजे ५०० किलो सोन्याची विक्री झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

धनत्रयोदशीनिमित्त सोन्याच्‍या दुकानांमध्ये किरकोळ ग्राहकांनी गर्दी केली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उन्हाळातील लग्नसमारंभ थांबले होते. तसेत गुढीपाडवा आणि अक्षयतृतीयेलाही सोने खरेदीवर विरजण पडले होते. टाळेबंदीनंतर बाजारात थोडी वर्दळ वाढली. दसऱ्यापासून बाजारपेठा फुलल्या आणि दागिने खरेदीचा ट्रेंड वाढला. 

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

धनत्रयोदशीच्या पूर्वीच सोन्याच्या दरात घसरण झाल्याने बाजार चांगलाच खुलला. तो खुलण्याची अपेक्षा असल्यानेच किरकोळ व्यावसायिकांनी ६०० किलोंपेक्षा अधिक प्रमाणात सोने बोलवून ठेवले होते. त्यापैकी जवळपास ५०० किलो सोन्याची उलाढाल धनत्रयोदशीच्या निमित्ताने झाली.

जेम्स अॅण्ड ‌ज्वेलरी फेडरेशनचे संचालक पुरुषोत्तम कावळे यांनी सांगितले की, ‘घाऊक बाजारात सोने-चांदीला अपेक्षेपेक्षा अधिक मागणीचा जोर होता. अचानक एक किलो सोन्यामागे दोन दिवसांत एक लाख रुपयांची घसरण झाल्याने ग्राहकांच्या चेहऱ्यावर दागिने खरेदीचा आनंद झळकत होता. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी किरकोळ व्यापाऱ्यांकडून सतत मागणी सुरू होती.
एकूणच धनत्रयोदशी‌निमित्ताने घाऊक बाजार चांगलाच जोमात राहिला. पण, पुढील काळ लग्नसराईचा आहे. त्यामुळे ग्राहकांनी घसरलेल्या दराचा लाभ घेण्यासाठी खरेदीसाठी दागिने बुकिंगही करून ठेवले आहेत. 

कर्मचारी वर्गाकडेही मोठ्या प्रमाणात पैसा असल्याने बाजार उठला आहे. तो आता लग्नाचा काळ असल्याने पुढील दोन-तीन महिने कायम राहील, असेही त्यांनी सांगितले. धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून चांदीलाही मोठ्या प्रमणात मागणी असल्याचे चित्र होते. याच दिवशी अंदाजे ७०० ते ८०० किलो चांदीची विक्री झाल्याचा अंदाज एका व्यापाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

सविस्तर वाचा - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात ढगाळ वातावरण; थंडी पळविली आणि पावसाची शक्यता

१०० टन धातूची विक्री

धनत्रयोदशीला पिवळ्या धातूचे महत्त्व असते. यामुळेच सोने खरेदी करू न शकणारे ‌पितळ व तांब्याच्या उपकरणांची खरेदीदेखील करतात. तांबे व पितळेच्या पूजेच्या सामानाची जोमाने खरेदी केली. धर्मशास्त्राप्रमाणे या खरेदीला महत्त्व असल्यानेच ताम्हण, लोटा, पंचारती, नंदादीपसोबत लक्ष्मी, देवी, बाळकृष्ण यांच्या मूर्तींनादेखील मोठी मागणी होती. उत्पादन खर्च वाढल्याने यंदा भांड्यांच्या दरात २० टक्के वाढ झालेली आहे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने घाऊक बाजारात १०० टन मालाची विक्री झाली असून अंदाजे पाच कोटींची उलाढाल झाल्याचे इतवारी मेटल असोसिएशनचे अध्यक्ष रामकिशोर काबरा यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 500 kilogram gold sold out on occasion of Dhantrayodashi