
बुधवारी येथील शहरी आणि ग्रामीण भागात २६४ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. तर त्याहून दीड पट रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले. २४ तासांत ११ बाधितांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या दिवशीही बाधितांची संख्या वाढलेलीच आहे
नागपूर ः विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांवर योग्य उपचार होत नसल्यामुळे नागपुरातील मेयो, मेडिकलमध्ये कोरोनाबाधितांना रेफर करण्यात येत होते. मागील आठ महिन्यात सुमारे ६९६ जणांना जिल्ह्याबाहेरून रेफर करण्यात आले. यापैकी ५१४ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्याबाहेरून रेफर करण्यात आलेल्या कोरोनाबाधितांचे सुमारे ७५ टक्के मृत्यू झाल्याची नोंद आहे.
बुधवारी येथील शहरी आणि ग्रामीण भागात २६४ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. तर त्याहून दीड पट रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले. २४ तासांत ११ बाधितांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या दिवशीही बाधितांची संख्या वाढलेलीच आहे. ४५३ बाधितांमध्ये शहरातील ३७६ रुग्ण तर ग्रामीण भागातील ७५ रुग्ण आढळून आले.
जिल्ह्याबाहेरून रेफर करण्यात आलेल्या २ रुग्णांना बाधा झाल्याचे प्रयोगशाळेतून पुढे आले. त्यामुळे आजपर्यंतच्या बाधितांची संख्या १ लाख १२ हजार ७१३ वर पोहचली आहे. यात शहरातील कोरोना बाधितांची संख्या ८९ हजार १२२ तर ग्रामीण २२ हजार ९१५ आहे. २४ तासांमध्ये शहरातील ६, ग्रामीण भागातील ३ तर जिल्हाबाहेरील रेफर केलेल्या २ अशा एकूण ११ कोरोनाबाधितांचे मृत्यू नोंदवले गेले.
आतापर्यंत ३ हजार ६९२ मृत्यूंची नोंद झाली. यात शहरातील मृत्यूची संख्या २ हजार ५४३ तर ग्रामीण ६३५ अशी आहे. जिल्हाबाहेरून रेफर केलेले ५१४ दगावले आहेत. दिवसभरात शहरातील २३०, ग्रामीण भागातील ३४ असे एकूण २६४ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे आजपर्यंत कोरोनामुक्तांची संख्या १ लाख ३ हजार ८३० वर पोहचली आहे.
सक्रिय कोरोनाबाधित पाच हजारांवर
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट दिसत आहे. शहरी भागात बुधवारी ४ हजार ४६१ तर ग्रामीणला ७५० असे एकूण ५ हजार २११ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. यातील १ हजार ३६ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर ३ हजार ७२२ कोरोनाबाधित गृह विलगीकरणात आहेत. जिल्ह्यात सलग दोन दिवस पाच हजाराहून कमी चाचण्या झाल्या आहेत. मात्र दोन दिवसांपासून पाच हजार चाचण्या होत आहेत. एकूण ५ हजार ५१३ चाचण्यांचा समावेश होता.
क्लिक करा - आई म्हणून जन्मदात्रीने आपले कर्तव्य पार पाडले; मात्र, मुलांनी सोडले वाऱ्यावर!
रेल्वेत २ कोरोनाबाधित आढळले
दुसऱ्या लाटेची भिती लक्षात घेता विमानतळ आणि रेल्वे स्थानक येथे सातत्याने प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. दोन दिवसांपासून विमानतळावर एकही बाधित आढळून येत नाही. मात्र बुधवारी अचानक नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर केलेल्या चाचणीतून दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. यामुळे रेल्वे प्रवासी व रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
संपादन - अथर्व महांकाळ