सावधान! आठ दिवसांत ४ हजार रुग्णांची वाढ, नव्याने साडेसातशे बाधित; मृत्यूही वाढले

राजेश प्रायकर
Saturday, 20 February 2021

दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने तोंड वर केले असून, दररोज पाचशेवर नवे बाधित आढळून येत आहेत. मागील शुक्रवारी १२ फेब्रुवारीपर्यंत एकूण बाधितांची संख्या १ लाख ३७ हजार ८१४ पर्यंत पोहोचली होती. आज एकूण बाधितांची संख्या १ लाख ४१ हजार ७८२ वर गेली. आठवड्याभरात ३ हजार ९६८ बाधितांची भर पडली.

नागपूर : पंधरवड्यापूर्वी दोनशे ते अडीचशेपर्यंत असलेला कोरोनाबाधितांचा आलेख या आठवड्यात दररोज पाचशेने वाढत असून, प्रशासनात धडकी भरली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात आज ७५४ नवे बाधित आढळून आल्याने महापालिका प्रशासनासह आरोग्य यंत्रणेतही खळबळ उडाली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत आठ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, बळींच्या संख्येतही आज वाढ झाली. त्यामुळे महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून आणखी कडक पाऊले उचलली जाण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा - कार्यक्रम रद्द, मग शाळा-महाविद्यालये सुरू का? पालकांचा सवाल;  प्रशासनाला गांभीर्य कळेना

दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने तोंड वर केले असून, दररोज पाचशेवर नवे बाधित आढळून येत आहेत. मागील शुक्रवारी १२ फेब्रुवारीपर्यंत एकूण बाधितांची संख्या १ लाख ३७ हजार ८१४ पर्यंत पोहोचली होती. आज एकूण बाधितांची संख्या १ लाख ४१ हजार ७८२ वर गेली. आठवड्याभरात ३ हजार ९६८ बाधितांची भर पडली. ५ ते १२ फेब्रुवारी या आठवड्यात नवे २ हजार ३४४ बाधित आढळले होते. या आठवड्यात वाढलेल्या संख्येने प्रशासनाची झोप उडाली आहे. आज विविध लॅबमध्ये तपासणी करण्यात आलेल्या ५ हजार ६४९ नमुन्यांच्या अहवालातून ७५४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यात शहरातील ६०३ जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे शहरातील आकडे वाढतानाच ग्रामीणमध्ये दिलासादायक स्थिती होती. परंतु आज ग्रामीणमध्येही १४८ नव्या बाधितांची भर पडली. शहराबाहेरील केवळ तिघांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये एकूण आठ कोरोनाबळींची नोंद करण्यात आली. यात शहरातील चौघांचा तर ग्रामीण भागातील एकाचा समावेश आहे. आतापर्यंत कोरोनाने ४ हजार २६१ जण दगावले. यात शहरातील २ हजाह ७६० तर ग्रामीण भागातील ७६३ जणांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील ७३८ जणांचा शहरात मृत्यू झाला. 

हेही वाचा - ब्रेकिंग: शेतकरी नेते राकेश टिकैत यांची यवतमाळमधील सभा अखेर रद्द;  शेतकरी...

कोरोनामुक्तांचा दर घसरला - 
शुक्रवारी २३४ जण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत १ लाख ३१ हजार ९४ जण बरे झाले. कोरोनातून मुक्त होणाऱ्यांचा दर ९३.०३ टक्के आहे. पंधरा दिवसांपूर्वी ५ फेब्रुवारीला कोरोनामुक्तांचा दर ९४.५४ होता. आज मात्र यात चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. 

सक्रिय रुग्ण साडेपाच हजारांवर -
पंधरवड्यापूर्वी सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार २१३ होती. आज जिल्ह्यात ५ हजार ६१७ सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने विलगीकरण केंद्र वाढविण्याची शक्यता बळावली आहे. शहरात ४ हजार ७०४ सक्रिय रुग्ण असून ग्रामीणमध्ये ९१३ आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 750 new corona positive cases found in nagpur