बाप रे! जिल्ह्यात निरनिराळ्या रोगांचे तब्बल ७७ हजारांपेक्षा जास्त रुग्ण; माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्व्हेक्षणातून माहिती उघड

निलेश डोये 
Sunday, 1 November 2020

माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या सर्वेक्षणासाठी नागपूर जिल्ह्यामध्ये १९९४ पथक तयार करण्यात आले. या पथकामध्ये १ हजार ७१७ आशांनी सर्व्हेक्षणाचे काम केले.

नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह नागपूर जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझाी जबाबदारी’ ही जागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ५ लाख ८६ हजार ६१२ कुटुंबातील २१ लाख ६४ हजार ३० लोकांची तपासणी करण्यात आली असून. यात ७७ हजार ६६२ लोक अतिधोकादायक (कोमॉर्बिड) स्तरावर असल्याचे आढळून आलेत. यातच मधुमेहाचे २७४९० तर हायपरटेंसी ४००५ रुग्ण असल्याचीही बाब उघडकीस आली.

माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या सर्वेक्षणासाठी नागपूर जिल्ह्यामध्ये १९९४ पथक तयार करण्यात आले. या पथकामध्ये १ हजार ७१७ आशांनी सर्व्हेक्षणाचे काम केले. त्यांच्या मदतीला १११ अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाने नेमून दिलेल्या पथकाच्या माध्यामातून घरोघरी जाऊन ताप, सर्दी, खोकला, सारी आदी संसर्गाशिवाय इतर आजार असलेल्या लोकांची तपासणी करण्यात आली. 

हेही वाचा - संशय अखेर ठरला खरा; कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या आकडेवारीतील घोळ सिद्ध

या मोहिमेत शहर, गाव, पाडे, तांडे यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी, जोखमीचे आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकास व्यक्तीश: भेटून आरोग्य विषयक शिक्षण दिले जात आहे. एक पथक सुमारे ५० घरांना भेट देऊन रुग्णांचे हृदयरोग, दमा, क्षयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा आजारांची माहितीही घेत आहे. 

अशा आजारांमुळे कोरोनाकाळात हे रुग्ण अतिधोकादायक स्तरावर असल्याने यांची विशेष काळजी घेतली जात आहे. जिल्ह्यात दोन टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसरा टप्पाही आता आपल्या अंतिम चरणावर आहे.

नक्की वाचा - कर्जबाजारी झाल्यामुळे युवकाने केली आत्महत्या; मृत्यूपूर्वी मैत्रिणीला बोलावले होते भेटायला

आजार व्यक्ती संख्या

मधुमेह -- २७४९०
हायपरटेंसी -- ४००५
मुत्रपिंड रोग -- ९७२
यकृत आजार -- ४८६
इतर आजाराने ग्रस्त -- ४४७०९
एकूण -- ७७६६२  

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 77 thousand plus patients of different diseases in nagpur district