बेजबाबदार महाविद्यालयांचे ॲकेडमिक ऑडिट होणार; नागपूर  विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांची ग्वाही 

मंगेश गोमासे 
Sunday, 1 November 2020

शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सध्या विद्यापीठासमोरील आव्हाने व संधी या विषयावर त्यांनी ‘सकाळ'शी संवाद साधला. खास करून सुविधा न देणाऱ्या महाविद्यालयांवर थेट कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.

नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या प्रशासकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा पदावर मंगळवारी डॉ. संजय दुधे यांची निवड करण्यात आली. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सध्या विद्यापीठासमोरील आव्हाने व संधी या विषयावर त्यांनी ‘सकाळ'शी संवाद साधला. खास करून सुविधा न देणाऱ्या महाविद्यालयांवर थेट कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.

हेही वाचा - शेतकऱ्याला अखेर मिळाले पिकविम्याचे पैसे; रक्कम वाचून बसेल धक्का

प्र. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी काय कराल?

उ . महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी योग्य शैक्षणिक वातावरण, सोयी, सुविधा, प्राध्यापक वर्ग देण्याची महाविद्यालयांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार न पाडणाऱ्या महाविद्यालयांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे. नव्या विद्यापीठ कायद्यात महाविद्यालयांचे ऍकेडमिक ऑडिट करावे लागणार आहे.

प्र. विद्यापीठाच्या विकासाबाबत आपले व्हीजन?

उ .विद्यापीठाचा विद्यार्थी हा केंद्रबिंदू राहिला आहे. व्हीजनही त्यांच्याच विकासाच्या दृष्टीने राहणार आहे. हीच प्रायोरिटी असल्याने प्रशासनाचाही त्या दृष्टीने कल राहणार आहे. सगळ्यांना वेळोवेळी येणाऱ्या अडचणी सोडविण्यास विशेष प्राधान्य देणार आहे. एलआयटीला स्वायत्तता मिळावी यासाठीही प्रयत्न करणार.

प्र. परीक्षेच्या समस्येवर कसा मार्ग काढाल ?

उ .ऑनलाइन परीक्षांवर भर देण्यात येत आहे. नवीन ट्रेनिंग कोर्सेसचा समावेश करण्याची गरज आहे. या दृष्टिकोनातून विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी भविष्यात फायदा होईल.

अधिक माहितीसाठी - जिल्हाप्रमुख झाले सह संपर्कप्रमुख; शिवसेनेत असंतोष

प्र. तुमच्या नियुक्तीबद्दल आरोप होत आहेत त्याबद्दल आपली भूमिका?

उ . कुलसचिव पदासाठी अर्ज केल्यावर मुलाखतीसाठी निवड झालेली होती. त्यामुळे मी अपात्र आहे असे म्हणता येणार नाही. माझी पात्रता ही कुलसचिव पदापेक्षा मोठी आहे. आपल्या अनुभवाच्या आधारे आणि कुलगुरूंच्या मार्गदर्शनात जे सर्वोत्तम करता येईल ते निश्चित करणार आहे. आगामी काळात सर्व प्रक्रिया पारदर्शक राहणार आहे. विद्यापीठाच्या कार्यप्रणालीवर महाविद्यालयांचा विश्वास वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात येईल.

  
संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Academic audit of irresponsible colleges will take by RTMNU