भरधाव वेगात ट्रॅव्हल्सने दिली टिप्परला धडक; दोन चालकांचा जागीच मृत्यू  

सतीश पुल्लजवार
Wednesday, 2 December 2020

शिवकुमार रामरंजन (वय 35,रा. बारतुड जि.कानपूर), सिराज खान सैयजाद खान (वय 35, रा. तेलीभागीया जि.आग्रा) अशी मृतांची नावे आहेत. गंभीर जखमी रामचंदर पासवान यास उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे

पांढरकवडा (जि. यवतमाळ)  : कामगार घेऊन जाणार्‍या भरधाव वेगातील ट्रॅव्हल्सने रस्त्यावर उभ्या असलेल्या टिप्परला धडक दिली. या अपघातात एका चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सहकारी चालकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी आहे. अपघाताची ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल कशीषजवळ बुधवारी (ता.दोन) सकाळी दहा वाजता दरम्यान घडली.

शिवकुमार रामरंजन (वय 35,रा. बारतुड जि.कानपूर), सिराज खान सैयजाद खान (वय 35, रा. तेलीभागीया जि.आग्रा) अशी मृतांची नावे आहेत. गंभीर जखमी रामचंदर पासवान यास उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. कानपूर येथील जवळपास 80 कामगारांनी चेन्नई येथे कामास जाण्यासाठी ट्रॅव्हल्स भाडेतत्वावर घेतली होती. 

क्लिक करा - आई म्हणून जन्मदात्रीने आपले कर्तव्य पार पाडले; मात्र, मुलांनी सोडले वाऱ्यावर! 

ट्रॅव्हल नियोजित स्थळी जात असताना आज सकाळी राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल कशिषजवळ टिप्पर अगदी मधोमध उभा होता. मागून भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रॅव्हल्स चालकास समोर टिप्पर दिसताच त्याने करकचून ब्रेक दाबत गाडी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र टिप्परला जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला. 

अपघात इतका भीषण होता की, यामध्ये ट्रॅव्हल्सचा समोरील भाग फुटल्याने कॅबिनमध्ये अडकून चालक शिवकुमार याचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी असलेला दुसरा चालक सिराज खान यास पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे दाखल केले आहे. वृत्तलिहेपर्यंत पोलिस कारवाई सुरू होती.

सविस्तर वाचा - ‘डिअर मम्मी-पप्पा, तुम्ही वेळ देत नाही आम्ही घर सोडतोय’; दोघ्या बहिणींचे इंस्टाग्राम प्रेम - 

मदतीऐवजी फोटो, व्हिडिओ शूटिंग

अपघाताची माहिती होताच घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. जखमींना मदत करण्याचे सोडून अनेकजण अपघाताचे फोटो, व्हिडिओ काढत होते. पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, सहायक पोलिस निरीक्षक संगीता हेलोंडे, पोलिसांचा मोठा फौजफाटा, राष्ट्रीय महामार्ग पोलिस, सामाजिक कार्यकर्ते संजय झोटिंग, नटवर शर्मा, अपघातग्रस्तांना मदत करणारे राजा पेंटर आदींनी कॅबिनमध्ये अडकून पडलेल्या चालकास बाहेर काढले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident of truck and travels near Yavatmal