हत्याकांडातील आरोपीला सिनेस्टाईल अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

रविवारी दुपारी कमलेश हा बडकस चौक, महाल परिसरात उभा असल्याची माहिती गुन्हे शाखेचे युनिट तीनला मिळाली. पोलिस निरीक्षक विनोद चौधरी आणि सहायक निरीक्षक योगेश चौधरी यांनी पथकासह सापळा रचला. पोलिसांना पाहताच कमलेश पळायला लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. काही अंतर पार केल्यानंतर सिनेस्टाईलने त्याला अटक केली.

नागपूर : उपराजधानीतील बहुचर्चित पिंटू शिर्के हत्याकांडातील कुख्यात गुंड राजू बद्रेच्या साथिदाराला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. तो येरवडा कारागृहातून संचित रजेवर आल्यानंतर फरार होता, हे विशेष. कमलेश सिताराम निंबर्ते (वय 38, मुद्रानगर, हुडकेश्‍वर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंटू शिर्के या कुख्यात गुंडाची 2002 मध्ये भरन्यायालयात हत्या करण्यात आली होती. हे हत्याकांड गुन्हेगारी जगतातील "टॉप' राजू बद्रे याने घडवून आणले होते. या हत्याकांडात जवळपास अकरा आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या हत्याकांडात आरोपी कमलेश निंबर्तेची मुख्य भूमिका होती. या हत्याकांडात मास्टरमाईंड राजू बद्रेला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. शिर्के हत्याकांडात पोलिसांनी कमलेशलाही अटक केली होती. कमलेशची क्रूरता लक्षात घेता त्याला पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी पाठविण्यात आले होते. तो येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत होता. त्याला 16 सप्टेबर ते 15 ऑक्‍टोबरपर्यंत पॅरोल मंजूर करण्यात आला होता. मात्र पॅरोल संपल्यानंतर 16 ऑक्‍टोबरला त्याला येरवडा जेलमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश होते. मात्र, तो कारागृहात हजर न होता पळून गेला होता. गेल्या तीन महिन्यांपासून तो फरार होता. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी कमलेश फरार झाल्याचा गुन्हा दाखल केला होता. आज रविवारी दुपारी कमलेश हा बडकस चौक, महाल परिसरात उभा असल्याची माहिती गुन्हे शाखेचे युनिट तीनला मिळाली. पोलिस निरीक्षक विनोद चौधरी आणि सहायक निरीक्षक योगेश चौधरी यांनी पथकासह सापळा रचला. पोलिसांना पाहताच कमलेश पळायला लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. काही अंतर पार केल्यानंतर सिनेस्टाईलने त्याला अटक केली.

तडीपाराला जुगार अड्‌डा संचालकाला अटक
लकडगंज हद्‌दीतील नामांकित जुगार-सट्‌टेबाज नितीन तिडकेला गुन्हे शाखेने अटक केली. ही कारवाई आज रविवारी करण्यात आली. आरोपी नितीन तिडकेवर आतापर्यंत तब्बल दोन डझनावर मटका जुगार आणि सट्‌टापट्‌टीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला काही महिन्यांपूर्वीच तडीपार करण्यात आले होते. परंतु, तडीपार केल्यानंतरही लकडगंज पोलिस ठाण्यातील काही भ्रष्ट पोलिस कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने तो लकडगंजमध्ये सट्‌टापटी चालवित होता. ही बाब गुन्हे शाखेचे योगेश चौधरी यांच्या लक्षात आली. त्यांनी सापळा रचून नितीनला अटक केली.
........

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused in murder case arrested by police