नागपुरात घडले "छपाक', "लेबॉरेटरी असिस्टंट'ने विभागप्रमुखावर फेकले हे...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

सततच्या तक्रारींना कंटाळून संबंधित महिला कर्मचाऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयात तृतीय श्रेणी कर्मचारी असलेल्या नीलिमा पूर्वी महाविद्यालयाच्या आयटी विभागात कार्यरत होत्या. परंतु, नव्या वर्षात त्यांची रसायनशास्त्र विभागात "लेबॉरेटरी असिस्टंट' म्हणून बदली करण्यात आली आहे.

नागपूर : सदर परिसरात असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रयोगशाळेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने विभागप्रमुख महिलेवर अमोनिया हे ज्वलनशील रसायन फेकल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. थेट अंगावर अमोनिया न पडल्याने विभागप्रमुख थोडक्‍यात बचावल्या. मात्र, कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बदनामी टाळण्यासाठी दोघींची समजूत घातल्याने अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.

सततच्या तक्रारींना कंटाळून संबंधित महिला कर्मचाऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयात तृतीय श्रेणी कर्मचारी असलेल्या नीलिमा पूर्वी महाविद्यालयाच्या आयटी विभागात कार्यरत होत्या. परंतु, नव्या वर्षात त्यांची रसायनशास्त्र विभागात "लेबॉरेटरी असिस्टंट' म्हणून बदली करण्यात आली आहे. नीलिमा या मागील महिन्यात विभागप्रमुखाची कोणतीही परवानगी न घेता अनेक दिवस रजेवर होत्या. तसेच कार्यालयात उशिरा येणे किंवा कर्तव्यात कसूर ठेवण्याचा त्यांच्यावर ठपका होता.

त्यामुळे आयटीच्या विभागप्रमुख अंजली यांनी नीलिमा यांची प्रभारी प्राचार्यांकडे प्रथम मौखिक तक्रार केली होती. यानंतर प्राचार्यांनी त्यांना बोलावून समज दिली. त्यानंतरही नीलिमा कामावर उशिरा येत होत्या. त्यामुळे विभागप्रमुखांनी प्राचार्यांकडे लेखी तक्रार केली होती. तक्रारीनंतर नीलिमा यांची वेतनकपात करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी चिडून अंजली यांच्याशी वादही घातला होता, अशी माहिती आहे.

दरम्यान, आज बुधवारी (ता. 15) दुपारी 12 वाजताच्या सुमारास नीलिमा या आयटी विभागप्रमुख अंजली यांच्या कॅबिनमध्ये गेल्या. "तुम्ही केलेल्या तक्रारींमुळे माझे वेतन कापण्यात आले', असे म्हणून वाद घातला. त्यानंतर हातात आणलेली ऍसिडची (अमोनिया) बाटली अंजली यांच्या अंगावर भिरकावली. परंतु, अंजली यांनी प्रसंगावधान राखून लगेच ओढणी चेहऱ्यासमोर धरली. त्यामुळे त्या थोडक्‍यात बचावल्या. घाबरून त्यांनी जोरात किंकाळी फोडली. त्यामुळे इतर कर्मचारी आणि प्राध्यापकांनी कॅबिनकडे धाव घेतली.

क्लिक करा - सरकार म्हणतेय महसूल बुडतोय, चला दारूविक्री सुरू करूया...
 

अद्याप गुन्हा दाखल नाही
या वेळी विभागप्रमुख प्रा. अंजली घाबरलेल्या अवस्थेत दिसून आल्या. प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ नीलिमा यांना कॅबिनमधून बाहेर काढून दुसऱ्या खोलीत बसविले. तसेच प्राचार्यांना प्रकरणाची माहिती दिली. प्राचार्यांनी दोघींचीही बाजू ऐकली आणि सदर पोलिसांना फोनवरून माहिती दिली. सदर पोलिसांनी लगेच नीलिमा यांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान, या प्रकरणाने प्रा. अंजली यांना प्रचंड मानसिक धक्का बसला असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी दिली.

प्रसंगावधानाने टळली घटना
प्रा. अंजली यांनी इथे का आल्यात, अशी विचारणा नीलिमा यांना केली. शिवाय हातात काय आहे, असे विचारले. त्यामुळे डोके सटकलेल्या नीलिमा यांनी हातात आणलेल्या शिशीचे झाकण उघडले. ते बघून डॉ. अंजली सावध झाल्या. लगेच त्यांनी चेहऱ्यावर ओढणी ओढली. त्यामुळे अमोनिया ओढणीवर पडल्याने प्रा. अंजली थोडक्‍यात बचावल्या.

काय झाले असते?
"लिक्विड' फॉर्ममध्ये असलेले अमोनिया चेहऱ्यावर पडल्यास दुखापत होण्याची शक्‍यता आहे. शिवाय ते जास्त संपर्कात आल्यास हृदयविकाराचा झटकाही येण्याची दाट शक्‍यता असल्याची माहिती रसायनशास्त्र विषयाच्या तज्ज्ञ प्रोफेसर डॉ. ममता लांजेवार यांनी दिली. प्रयोगशाळेत असलेले अमोनिया हे जवळपास "डायल्युटेड' असल्याने त्याला "अमोनिया हायड्राक्‍साइड' म्हटले जाते, असे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: acid attack on department head in nagpur