हातास काम मिळताना, ह्रदयी वसंत फुलला...

हातास काम मिळताना, ह्रदयी वसंत फुलला...

नांद (जि.नागपूर):  तेंदूपत्ता हंगाम हा मे महिन्यात सुरू होतो. हजारो कामगारांना रोजगार देणारा हा व्यवसाय यंदा लॉकडाउनमुळे अडचणीत आला होता. प्रदीर्घ कालावधीनंतर परिस्थितीत थोडा का होईना बदल झाला. कंत्राटदारांना संकलनाची परवानगी मिळाल्यामुळे पुन्हा संकलनाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे कामगारांना हायसे वाटत आहे.

केव्हा होतो सुरू हा व्यवसाय?
वसंत ऋतू आणि उन्हाळ्याची चाहूल लागताच तेंदूपत्ता कामगार तेंदूपत्ता संकलन करण्याच्या तयारीला लागतात. होळी संपल्यानंतर शेतातील कामे लवकरात लवकर आटोपून पुडके बांधण्यासाठी पळसाची मुळे गोळा करायला लागतात. शेतकरी असो की शेतमजूर दरवर्षी तेंदूपत्ता संकलनातून तीस ते चाळीस हजार रुपये पंधरा ते वीस दिवसांत कमवितात. त्या पैशातून शेतीला लागणारे बी-बियाणे खतासाठी वापर करतात आणि काही उरलेला पैसा उदरनिर्वाहासाठी खर्च करीत असतात. म्हणून दरवर्षी तेंदूपत्ता संकलन या परिसरात मोठ्या प्रमाणात होत असते.

हेही नक्‍की वाचा : रक्‍ताने माखलेल्या मृतदेहाने पारडीत खळबळ

यंदा आलेल्या अडचणी?
यावर्षी लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्याने तेंदूपत्ता संकलन करण्याचे कंत्राट होईल किंवा नाही याची चिंता कामगारांना लागली होती. अशात उशीर का होईना तेंदूपत्ता संकलन करण्यास कंत्राटदारांना मंजुरी दिल्याने या परिसरात तेंदूपत्ता संकलन मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. त्यामुळे मजुरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

हेही वाचा: युवकांना ठेंगा, पेंशनधारकांनाच पुन्हा नोकरीत संधी

समस्येवर केलेले उपाय?
प्रत्येक मजुरांमध्ये फिजिकल डिस्टन्स ठेवून तेंदूपत्ता संकलनाचे कार्य सुरू आहे.
या परिसरातून तेंदूपत्ता संकलनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. तेंदूपत्ता संकलनाच्या हंगाम पंधरा ते वीस दिवसांचा असून या हंगामासाठी या परिसरातील अनेक गावांतील मजुरांना रोजगार प्राप्त झाला आहे. पोटाची खळगी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पहाटेचे पाच वाजतापासून तर दुपारपर्यंत उन्हातान्हात मजूर एकेक पान गोळा करीत असतात. एका रानातून दुसऱ्या रानात धाव घेत हे कार्य अविरत सुरू असते. शेवटी गाठोडे भरले की ते डोक्‍यावर ओझं डोक्‍यावर घेऊन पाच ते सहा किलोमीटर उन्हात पायी चालत घरी येतात. पोटाची खळगी भरण्यासाठी रानावनात कुणाची भीती न बाळगता तेंदूपत्ता संकलन करण्यास मग्न असतात. त्यांना जिवाची पर्वा न करता वन्यपशूंच्या हल्ल्याला तोंडसुद्धा द्यावे लागते. कारण मजुरांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी गावातील झुंबडचे झुंबड जंगलात रवाना होतात. संकलन करण्यासाठी कुटुंबातील लहान मुलांपासून तर ज्येष्ठ व्यक्तीसुद्धा गुंतलेले असतात.

हंगाम कामगारांसाठी महत्वाचा
तेंदूपत्ता संकलनामुळे कामगारांचा वर्षाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटतो. म्हणून तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम कामगारांच्यादृष्टीने महत्त्वाचा वाटतो.
एकनाथ गजभिये
ग्रामस्थ, नांद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com