"डीड यू डू ईट?'नागपूरच्या अदितीचा दादासाहेब फाळके फिल्म फेस्टीवलमध्ये सन्मान

मनीषा येरखेडे
गुरुवार, 25 जून 2020

नागपूरची कन्या असलेल्या अदितीच्या "डीड यू डू ईट' या डाक्‍युमेंटरीला नुकताच दादासाहेब फाळके फिल्म फेस्टीवल सोहळ्यात, बेस्ट एडींटीगचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

नागपूर : स्वयंपाकघरातील सडलेल्या भाज्या, फळे, प्लास्टीकच्या पिशव्या इत्यादी कचरा आपण सहज बाल्कनीतून हात लांबवून फेकून देतो. तो कचरा कुठे जातो, त्याच पुढे काय होते याचा विचार न करता.. तसेच रस्त्यावर चालतांना गाड्यांचा हॉर्न वाजवतो विनाकारणच... हातात असलेले चॉकलेट, पाणी बॉटल, फास्टफूडचे कुठलेही पाकीट असेच भिरकावतो हवेत.. हा सगळा कचरा जमा होतोय.. पृथ्वीच्या पोटात. त्याचा त्रासही या पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक जिवाला होतोय.. यासाठी " आपणच जबाबदार आहोत काय?' असा उपरोधिक सवाल डाक्‍युमेंटरीच्या माध्यमातून नागपूरच्या अदिती भांडे यांनी विचारला आहे.

नागपूरची कन्या असलेल्या अदितीच्या "डीड यू डू ईट' या डाक्‍युमेंटरीला नुकताच दादासाहेब फाळके फिल्म फेस्टीवल सोहळ्यात, बेस्ट एडींटीगचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. अदितीने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण एलईडी कॉलेजमधून पूर्ण केले आहे. अदितीचे वडील श्रीकांत भांडे यांची दिल्ली येथे बदली झाल्याने, अदितीनेही पुढील शिक्षण अजीम प्रेमजी युर्निव्हसिटी, बंगलोर येथून पूर्ण केले. तिने, डाक्‍युमेंटरी तयार करण्याचे तंत्र शिकून घेतले. यानंतर, झेवियर इंस्टीट्यूट ऑफ कम्युनिकेशन मुंबई येथून पीजीडीएम कम्युनिकेशन फॉर डेव्हलपमेंटचे शिक्षण घेत तिने आपल्या करीअरला सुरूवात केली.
डॉक्‍युमेंटरी फिल्म मेकर म्हणून काम सुरू केल्यानंतर अदितीने रोजच्या जगण्याशी निगडीत असलेल्या प्रश्‍नांना हात घालीत, छोट्या फिल्म तयार करण्यास सुरूवात केली. तिच्या डीड यू डू इट या मागील वर्षी तयार केलेल्या डॉक्‍युमेंटरीने बेस्ट एडिटींग, तसेच बेंगलोर शॉर्ट फिल्म फेस्टीवलमध्ये स्टुडंट डॉक्‍युमेंटरी कॅटेगिरीत बेस्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला.

तिने निवडली करीअरची वेगळी वाट
अदितीने नागपूरला पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. शिकत असतांनाच तिने शहरातील बापूजी बहुजन समाज कल्याण बहुउद्देशीय संस्थेतील चाईल्ड लाईनच्या प्रोजेक्‍टमध्ये उत्तम कामगिरी केली होती. भरकटलेल्या, हरवलेल्या, तस्करी करून आणलेल्या लहान मुलांच्या व्यथा तिने जवळून अनुभवल्या आणि चित्रबद्धही केल्या. लहानपणापासून कॅमेरा, लाईट याचे आकर्षण असलेल्या अदितीने सरळ रेषेचे करीअर न निवडता, आपल्या आवडत्या करीअरची वाट धरली. त्यासाठी तिने, बेंगलोर, दिल्ली आणि गाजीयाबाद येथे फिल्म मेकींगचे अनेक छोटे मोठे कोर्सेस केले. अनुभवी लोकांच्या हाताखाली काम करीत, तिने फिल्म मेकर म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सविस्तर वाचा - आता तुकाराम मुंढेंना करणार नगरसेवक बदनाम, हा घेतला निर्णय

फिल्म मेकिंग क्षेत्रातही मुली
सामान्य माणूस आपल्या रोजच्या जगण्यात अनेक चुका करीत असतो. त्या चुकांची शिक्षा त्याला स्वतः ला आणि त्याच्या पुढच्या अनेक पिढ्यांना भोगावी लागते. याच विषयाला हात घालीत "मी डीड यू डू ईट' ही डाक्‍युमेंटरी तयार केली आहे. सर्वसामान्यांच्या जगण्याशी संबध असल्याने, पाहणाऱ्याला ती चटकन भावते. मी स्वतःच यासाठी सिनेमेटोग्राफी, साऊंड रेकॉर्डीग करून घेतले असून, यापुढेही अनेक प्रोजेक्‍टवर काम सुरू आहे. मुलींनी आपली आवड ओळखून, करीअरचा मार्ग निवडला पाहीजे. आता कुठल्याही करीअरवर मुलांची मक्तेदारी राहिलेली नाही. फिल्म मेकिंग क्षेत्रातही मुलींनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
अदिती श्रीकांत भांडे, फिल्म मेकर.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditi got award for Did you do it documentry