आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन

Adv. Vimalsurya Chimankar passed away
Adv. Vimalsurya Chimankar passed away

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीने पावन झालेल्या "दीक्षाभूमी'भूमीवरून पाच दशकांपासून निळ्या टोपीतील समता सैनिक दलाचे माजी केंद्रीय संघटक तसेच राष्ट्रीय बौद्धीक प्रमूख ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे बुधवारी (ता.३०) सकाळी निधन झाले. ते ६५ वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी तसेच दोन मुले आहेत. अंबाझरी घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 त्यांना दोन दिवसांपूर्वी न्युमोनियाची लक्षणे आढळून आली. श्वसनाचा त्रास झाला. तत्काळ लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचाराला दाद मिळत नव्हती. अखेर बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आंबेडकरी चळवळ पुनर्स्थापित होऊन एकसंघ व्हावी, म्हणून घरदार आणि कुटूंबाची पर्वा न करता आपले आयुष्य समाजासाठी दिले. थोर अभ्यासक आणि आंबेडकरी तत्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून त्यांची ख्याती महाराष्ट्रात नाही तर देशातील विविध राज्यांमध्ये आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थापित समता सैनिक दलाचे वरिष्ठ मार्गदर्शक अॅड. चिमणकर यांच्या मार्गदर्शनात समता सैनिक दल या बाबासाहेबांच्या मातृसंघटनेच्या महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगढ येथे सुमारे तीन हजारांपेक्षा जास्त शाखा उभारण्यात आल्या आहेत. अविरत परिश्रम ॲड. विमलसूर्य चिमणकर यांनी केले. आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा लिहिण्याची आणि अंमलबजावणी करण्याची भीमघोषणा समता सैनिक दलाच्या माध्यमातून त्यांनी सुरू केली. पाच हजार तरुण सैनिकांची फौज त्यांनी तयार केली.

प्रत्येक भीमसैनिकाच्या डोक्‍यावर असलेली निळी टोपी हेच आमच्या क्रांतीचे निशाण आहे, हे सांगण्यासाठी संविधान चौक ते दीक्षाभूमी असा समता सैनिक दलाचा समता मार्च दोन दशकांपासून त्यांच्या नेतृत्वात काढण्यात येतो. मराठवाडा विद्यापीठ आंदोलनादरम्यान शहिदांच्या कुटुंबाशी संपर्क साधून नामांतर आंदोलनातील ‘सूर्यांकूर’ ॲड. चिमणकर यांच्या लेखणीतून साकार झाले. विद्यार्थी दशेपासूनच ते आंबेडकरी चळवळीत सक्रीय होते. रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले. चळवळ निखळपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर अधिष्ठित व्हावी यासाठी त्यांची धडपड होती. 

पक्षघाताने घाव घातल्यानंतर शरिर दुबळे झाले, परंतु त्यांचे मन आणि वैचारिक बैठक अतिशय ध्येयवादी होती, यामुळेच त्यांचे सर्वाधिक साहित्य हे पक्षघात झाल्यानंतर प्रकाशित झाले. केवळ पक्षघातच नाही, तर दोन वेळा ह्दय विकाराचा झटका आल्यानंतरही त्यांनी मृत्यूवर विजय मिळवला. १९९३ साली प्रकाशित झालेले ‘द्वितीय महायुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे या पुस्तकाची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली. त्यांच्या अकाली झालेल्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील नव्हेतर समता सैनिक दलाची मोठी हानी झाली आहे.


समता सैनिक दलातर्फे मानवंदना

अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी समता सैनिक दलाच्या शंभरावर सैनिकांनी अखेरचा निरोप देताना त्यांना मानवंदना देण्यात आली. यानंतर शोकसभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक सुनील सारीपुत्त होते. माजी आमदार उपेंद्र शेंडे, निरंजन वासनिक, नरेश वाहणे, प्रा. राहूल मून, प्रकाश दार्शनिक, बाबा बाभळे, डॉ. वाणे, राजेश वालदे, डॉ. विमलकिर्ती, प्रेमकुमार उके, घनश्याम फुसे, प्रकाश कुंभे, राजन वाघमारे, रवी शेंडे , विलास पाटील, अशोक जांभुळकर, अशोक बोंदाडे, प्रवीण कांबळे, अॅड,. संजय पाटील, विनोद थुल यांच्यासह मोठया संख्येत आंबेडकरी चळवळीतील कार्यकतें मोठया संख्येत उपस्थित होते.

ॲड. चिमणकर लिखित पुस्तके

  • द्वितीय महायुद्ध आणि डाॅ. आंबेडकर
  • मार्क्स आणि आंबेडकर एक द्वंद
  • रिडल्स नंतरचा जातीय वणवा
  • दोन सूर्य दोन घुबडे
  • सूर्याकूर,
  • नामांतर वा सत्तांतर
  • खैरलांजी एक सवाल
  • वेटिंग फार व्हिसा,
  • साकेत की अयोध्या? 

संपादन  : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com