
चांपा गावचा शनिवारी आठवडी बाजार, बैल बाजार, भाजीपाला बाजारही भरला होता. शेतकरी मोठ्या संख्येने भाजीपाला विक्रीसाठी आले होते. अनेक लहानमोठ्या व्यावसायिकांनी बाजारात आपली दुकाने थाटली होती.
चांपा (जि. नागपूर) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नऊ महिन्यांपासून बंद असलेला उमरेड बाजार समितीअंतर्गत येणारा चांपा येथील बैलबाजार फुलल्याचे चित्र शनिवारी पहावयास मिळाले. उमरेड बाजार समितीअंतर्गत असलेला चांपा गावचा बैलबाजार प्रसिद्ध आहे. कोरोनामुळे मार्च २०२० पासून बंद असलेला चांपा गावचा बैलबाजार सुरू करण्याचे शासन निर्णयानंतर ठरल्याप्रमाणे शनिवारी (२ जानेवारी) पहिल्यांदाच भरला.
चांपा बैलबाजारात मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीसाठी येत होती. बाजाराच्या पहिल्याच दिवशी जनावरांची खरेदीविक्री झाली. बाजार सुरू झाल्याने व्यापारी, शेतकरी, छोटे मोठे व्यावसायिक यांना दिलासा मिळाला आहे. हातावर पोट असणाऱ्या अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटणार असल्याने बाजारात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह दिसला.
चांप्यात कोरोनाकाळानंतर पहिल्यांदाच बैलबाजारात दोनशे एक जनावरे विक्रीसाठी आली होती. बैलबाजारात मोठी हालचाल दिसली. परंतु, बाहेर गावचे ग्राहक कमी असल्याने मोठ्या जनावरांची विक्री संथ गतीने होत असल्याने शेतकरी व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली जनावरे पुन्हा परत न्यावी लागली. यातील अर्धी जनावरे विक्रीअभावी परत गेली.
चांपा गावचा शनिवारी आठवडी बाजार, बैल बाजार, भाजीपाला बाजारही भरला होता. शेतकरी मोठ्या संख्येने भाजीपाला विक्रीसाठी आले होते. अनेक लहानमोठ्या व्यावसायिकांनी बाजारात आपली दुकाने थाटली होती.
कोरोना लॉकडाउननंतर तब्बल नऊ महिन्यांनी चांप्यात बैलबाजार भरला. कोरोना ‘अनलॉक’नंतर सुरू झालेल्या पहिल्याच बाजारात सरासरीपेक्षा कमी प्रमाणात जनावरे विक्रीसाठी आली होती. नेहमीपेक्षा ३० ते ३५ टक्केच बाजार भरला.
संपादन - नीलेश डाखोरे