esakal | ...अखेर मॉस्कोत अडकलेल्या त्या प्रवाशांचे झाले नागपूर विमानतळावर आगमन
sakal

बोलून बातमी शोधा

airport

रशियात अडकलेले मराठीजन "वंदे भारत' अभियानांतर्गत मायदेशी परतले. यात पुणे, ठाणे, औरंगाबाद व मुंबईतील 28 रहिवाशांचा समावेश होता. त्यांना सोडून देण्यासाठी एसटी महामंडळाने बस उपलब्ध करून दिली. त्यातून हे सर्व जण सोमवारी सकाळी रवाना झाले.

...अखेर मॉस्कोत अडकलेल्या त्या प्रवाशांचे झाले नागपूर विमानतळावर आगमन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या संकटामुळे जग जिथल्या तिथे ठप्प झाले. अनेकजण शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा काही कामासाठी विदेशात गेले होते. तेही नाईलाजाने परदेशातच अडकले. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने विदेशात अडकलेल्यांचे परतीचे मार्ग बंद होते. कोरोनाच्या संकटातून थोडे सावरल्यानंतर भारत सरकारने परदेशात अडकलेल्या भारतात परत आणण्यासाठी विमान सेवा सुरू केली, आणि टप्प्याटप्प्याने का होईना, पण भारतीय मायदेशी परतू लागले आहेत.

रशियात अडकलेले मराठीजन "वंदे भारत' अभियानांतर्गत मायदेशी परतले. यात पुणे, ठाणे, औरंगाबाद व मुंबईतील 28 रहिवाशांचा समावेश होता. त्यांना सोडून देण्यासाठी एसटी महामंडळाने बस उपलब्ध करून दिली. त्यातून हे सर्व जण सोमवारी सकाळी रवाना झाले.

रशियात अडकलेल्या शंभरहून अधिक भारतीयांना वंदे भारत अभियानांतर्गत स्वदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू होते. मॉस्कोहून एकूण 145 प्रवाशांना प्रथम दिल्लीत आणण्यात आले. तिथून विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आणण्यात आले. सोमवारी पहाटे 4.30 वाजता या विमानाने नागपूर विमानतळावर लॅंडिंग केले. विमानात नागपूर जिल्ह्यातील 35, छत्तीसगडचे 15, मध्य प्रदेशातील एक, पश्‍चिम महाराष्ट्रातील 28 व उर्वरित नागपूरलगतच्या भागातील प्रवाशांचा समावेश होता. नागपूर विमानतळावर नियमानुसार सर्व प्रवाशांची तपासणी करून हातावर होम क्वारंटाइनचे स्टॅम्प मारण्यात आले. नागपूर व लगतच्या भागातील प्रवाशांनी वाहनांची सोय करून ठेवली होती.
 हेही वाचा - वडेट्टीवार म्हणतात, विश्‍वास नसेल तर मी सारथीतून बाजुला व्हायला तयार!
या विमानातून पुणे, ठाणे, औरंगाबाद व मुंबईच्या 28 प्रवाशांचेही आगमन झाले. जिल्हा प्रवेशबंदी कायदा लागू असल्याने वाहनांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येत नाही. कायदेशीर अडचण असल्याने प्रशासनाकडून एसटी महामंडळाकडे मदतीसाठी विचारणा करण्यात आली. महामंडळाने प्रवाशांना सोडून देण्याची तयारी दाखवत तातडीने बस उपलब्ध करून दिली. सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही बस नागपूर विमानतळावर आली. 6.30 वाजताच्या सुमारास बस प्रवाशांना घेऊन रवाना झाली. यापूर्वी शुक्रवारीही दोहाहून 147 प्रवासी नागपुरात पोहोचले. यात भोपाळ व इंदूरच्या सुमारे 15 प्रवाशांचा समावेश होता.