
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रविवारी नागपूर दौरा होता. त्यावेळी पत्रकारपरिषदेत त्यांना पहाटेच्या शपथविधीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी चांगलीच फटकेबाजी केली.
नागपूर : सकाळी ८ वाजताच्या शपथविधीला पहाट म्हणू शकतो का? पहाटे म्हणजे ४ आणि ५ वाजता याला पहाट म्हणतात. मी माझ्या मतदारसंघात सकाळी साडेसहा वाजतापासून कामाला सुरुवात करतोय. आता जे सूर्यमुखी आहे, त्यांना ते पहाटे वाटेल. त्याला मी काही करू शकत नाही, असे फटकेबाजी उपमुख्यमंत्री अजितपवारांनी केली. नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारला आला असता ते बोलत होते.
हेही वाचा - सकाळच्या वेळी शेतातून येत होता खळखळ आवाज; जाऊन बघताच तळपायाची आग गेली मस्तकात
तुम्हाला तरी पटतं का हो...
आमचे सरकार साखर कारखानदारांना त्रास देत आहे, असे वक्तव्य अमित शहा यांनी केले. यावर काय सांगाल, असा प्रश्न अजितदादांना केला असता, 'तुम्हाला तरी हे पटतं का हो...’, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. ते म्हणाले, आम्ही स्वतः साखर कारखानदारीशी संबंधित लोक आहोत. जयंत पाटलांचे चार कारखाने, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांचेही साखर कारखाने आहेत, आणखी किती उदाहरण देऊ, असे सांगताना त्या प्रश्नावर मिश्कील हसत त्यांनी पुढील प्रश्नाचा इशारा केला.
पेट्रोल डिझेलच्या भावांत दिलासा?
पेट्रोल डिझेलचे भाव ज्या पद्धतीने वाढत आहेत ते पाहता ते लवकरच शंभरी गाठतील हे स्पष्टपणे दिसत आहे. यातून सर्वसामान्यांना दिलासा देण्याविषयी माझ्या मनात एक निश्चित लाईन ठरलेली आहे. पण, म्हणून मी आजच काही घोषणा करणार नाही. मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर अर्थसंकल्पात या विषयी निर्णय घेता येईल, असे संकेत दादांनी दिले.
हेही वाचा - सद्स्यांसोबत ग्रामस्थांनीही नाकारले, हातचे पद गमावले अन् आनंदावर पडले विरजण
अर्थसंकल्पात होऊ शकते तूट -
राज्याच्या महसूली उत्पन्नात आधीच ७५ हजार कोटींची तूट आहे. याशिवाय केंद्राकडून २५ हजार कोटींचा जीएसटीचा परतावा यायचा आहे. मार्चपर्यत हा परतावा न आल्यास राज्याचा अर्थसंकल्प १ लाख कोटी तुटीचा राहू शकतो, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.
अर्थमंत्र्यांना व्हिलनच व्हावे लागते -
वीज देयक माफी प्रश्नावर बोलताना अजित पवार यांनी अर्थमंत्र्यांना व्हिलनच व्हावे लागते, असे वक्तव्य केले. माझ्यासह प्रत्येकाने आर्थिक भार उचलण्याची आपली क्षमता केवढी आहे, याचा विचार करूनच बोलले पाहिजे. कारण सध्या राज्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे. तरीही आम्ही शेतकऱ्यांना व्याज आणि दंडाचे १५ हजार कोटी माफ केले. यानंतरही वीज बिल माफी अर्थमंत्र्यांनीच रोखल्याचे आरोप झाले. त्याला मी काही करू शकत नाही. अर्थमंत्र्यांना व्हिलनच व्हावे लागते, असे ते म्हणाले.