पहिल्याच ठोक्‍याला उघडली शाळा अन्‌ दुर्गंधीमुळे सारेच हैराण, मग उडाली एकच धावपळ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

शुक्रवार, 26 जूनपासून शाळेची घंटा न देता शाळा सुरू करण्यात आल्या. तालुक्‍यातील कन्हान पोलिस ठाण्याअंतर्गत येणारी जिल्हा परिषद शाळा सिहोरा, कन्हान येथील शिक्षक सकाळी 10 वाजता शाळेत पोहोचले.

टेकाडी (जि. नागपूर) : कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी यंदा विद्यार्थ्यांविनाच शाळेची पहिली घंटा खणखणली. गाजवाजा न करताच शिक्षकांनी शाळा उघडली. कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत वर्गांची स्वच्छता करत असताना एका भलत्याच दुर्गंधीने शिक्षकांचा श्‍वास गुदमरला. पारशिवनी तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळा सिहोरा येथे हा संतापजनक प्रकार घडला. त्याचे झाले असे... 

प्राप्त माहितीनुसार, राज्य शासनाच्या आदेशान्वये कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करत शुक्रवार, 26 जूनपासून शाळेची घंटा न देता शाळा सुरू करण्यात आल्या. तालुक्‍यातील कन्हान पोलिस ठाण्याअंतर्गत येणारी जिल्हा परिषद शाळा सिहोरा, कन्हान येथील शिक्षक सकाळी 10 वाजता शाळेत पोहोचले. शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने वर्गखोल्या स्वच्छ करण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, शाळा स्वच्छ करताना शिक्षकांना शाळेत दारूचा वास येऊ लागला. 

क्लिक करा - भीषण अपघात : ट्रकने दुचाकीस्वाराला पाचशे मिटर नेले फरफटत; अंगावरचे कपडेही...
 

त्यामुळे शिक्षकांच्या मनात अनेक तर्कवितर्कांना पेव फुटला. शाळेतील मुख्य पोषण आहार सेविका शशिकला मेश्राम यांच्याकडे संपूर्ण शाळेची जबाबदारी असल्याने शाळेची किल्ली त्यांच्याकडेच असते. अशात चौथ्या वर्गाची खोली स्वच्छ करण्यासाठी कुलूप उघडण्याचे प्रयत्न गेले; परंतु कुलूप उघडत नव्हते. शेवटी दुपारी तीनच्या सुमारास वर्गखोलीचे कुलूप उघडले आणि सारेच अवाक्‌ झाले. 

वर्गखोलीत चक्क देशी-विदेशी दारूचा साठा पाहून उपस्थित शिक्षक आश्‍चर्यकित झाले. याबाबत मुख्याध्यापक रामदास बाभूळकर यांनी कन्हान पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत शाळेतून बिअरच्या 9 बाटल्या, देशी दारूच्या 5 पेट्या असा एकंदरीत 14 हजार 445 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुख्याध्यापक रामदास बाभूळकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alcohol was found in the school on the first day