कारभारी लय भारी! सर्वच राजकीय पक्ष फॉर्मात; एकूण जागा १२७ अन् दावे मात्र १७० जागांचे

राजेश चरपे 
Tuesday, 19 January 2021

जिल्ह्यातील १३० ग्राम पंचायतीच्या निवडणूक जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका ग्राम पंचयातीची निवडणूक रद्द झाली तर दोन ग्रा.प.मध्ये अविरोध निवडूक झाली. त्यामुळे प्रत्याक्षात १२७ ग्राम पंचायतींमध्ये निवडणूक घेण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी काँग्रेसने ८३ जागा जिंकल्याचा दावा केला आहे. 

नागपूर ः ग्राम पंचायतीचे निकाल जाहीर झाले असून आपणच सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा काँग्रेस आणि भाजपच्यावतीने केला जात आहे. त्यात राष्ट्रवादी, शिवसेना यांची आकडेवारी धरल्यास सुमारे १७० ग्राम पंचायतींवर दावेदारी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात १२७ ग्राम पंचायतीमध्येच निवडणूक झाली आहे. काँग्रेसच्या दाव्यानुसार ८३ तर भाजपने ७३ ग्राम पंचायती जिंकल्याचा दावा केला आहे.

जिल्ह्यातील १३० ग्राम पंचायतीच्या निवडणूक जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका ग्राम पंचयातीची निवडणूक रद्द झाली तर दोन ग्रा.प.मध्ये अविरोध निवडूक झाली. त्यामुळे प्रत्याक्षात १२७ ग्राम पंचायतींमध्ये निवडणूक घेण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी काँग्रेसने ८३ जागा जिंकल्याचा दावा केला आहे. 

हेही वाचा - संपूर्ण विदर्भातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल एका क्लिकवर; वाचा कोणी कुठे मारली बाजी   

आपल्याकडे प्रत्येक तालुक्यानुसार आकडेवारी उपलब्ध आहे. जिथे पराभव झाला ते आम्ही मान्य केले आहे असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे भाजपचेजिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी ७३ जागा जिंकल्याचा दावा केला आहे. काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये २२ पैकी ९, रामटेकमध्ये २० पैकी ६, उमरेड ४१ पैकी ३२, हिंगणा १० पैकी ३ जागांवर भाजपला स्पप्ट बहूमत मिळाल्याचे म्हटले आहे. सोबतच काही ग्राम पंचायतींवर अपक्षांच्या मदतानी भाजपचा झेंडा फडकणार असल्याचे गजभिये यांनी सांगितले.

दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रसने काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघातील नरखेड तालुक्यातील १७ पैकी १६ जागा जिंकल्याचा दावा केला आहे. आम आदमी पार्टी तसेच मनसेनेही काही जागा जिंकल्याचे म्हटले आहे. त्यामुळे संभ्रमात अधिकच भर पडली आहे.

प्रत्येक पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविली होती. राज्यातील महाविकास आघाडीची एकत्रित आकडेवारी बघतिल्यास ९३ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात महाघाडीचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट होते. याआकडेवारीनुसार भाजपच्या वाट्याला फक्त ३४ जागा येतात. बऱ्याच ग्राम पंचायतींमध्ये कुठल्याच पक्षाला बहुमत मिळालेले नाही. अपक्षांनीसुद्धा मुसंडी मारली आहे. त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. सरपंचाच्या निवडणुकीनंतर कुठल्या पक्षाचे वर्चस्व राहील हे स्पष्ट होईल.

काँग्रेसतर्फे सर्व उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली होती. प्रचारासाठी पत्रकेही छापण्यात आली होती. तोपर्यंत भाजपने कुठलाच आक्षेप घेतला नाही. त्यानुसार सर्वाधिक जागा काँग्रेसने जिंकल्याचे स्पष्ट होते. जेथे पराभव झाला तो आम्ही मान्य केला. आता भाजप आमच्या काही विजयी उमेदवारांवर दावा करून खोटे बोलत आहे.
राजेंद्र मुळक,
जिल्हाध्यक्ष काँग्रेस

नक्की वाचा - जन्मदाता बापच करत होता घृणास्पद कृत्य; अखेर दिरानं उचलला विडा अन् घडला थरार

भाजपने ७३ ग्राम पंचयातीमध्ये स्पष्ट बहुमत मिळवले आहे. आणखी काही ग्राम पंचयातींमध्ये अपक्षांच्या सहकार्याने भाजपचा झेंडा फडकणार आहे. आम्ही एकटे लोढलो. विरोधकांनी महाआघाडी केली होती. आता कोणीही कितीही दावे केले तरी नागपूर जिल्ह्यात भाजपनेच वर्चस्व निर्माण केले आहे.
अरविंद गजभिये,
जिल्हाध्यक्ष, भाजप 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All Political parties are claiming win in Gram Panchayat Election Results in Nagpur